‘भाजपाच काय, मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही’– कंगना रणौत

0
285

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातील दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांची मन जिंकणारी अभिनेत्री कंगना रणौत राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून रंगत होती. मात्र एका कार्यक्रमामध्ये कंगनाने या मुद्द्यावर भाष्य करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ‘भाजपाच काय तर अन्य कोणत्याही पक्षामधून मी राजकारणात प्रवेश करणार नाही’, असे तिने स्पष्टपणे सांगितले आहे.

कंगना सध्या तिच्या आगामी ‘जजमेंटल है क्या’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यातच काही दिवसापूर्वी झालेल्या एका कार्यक्रमामध्ये कंगनाला राजकारणात प्रवेश करण्याविषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नांची उत्तर देत तिने राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे ठामपणे सांगितले.

“भारतीय जनता पार्टीच काय, मी अन्य कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश करणार नाहीये. मी बेधडकपणे बोलत असते, त्यामुळे माझ्या अशा स्वभावामुळे मी राजकारणात टिकू शकत नाही. मी कोणत्याही पक्षामध्ये बांधून राहिल्यासारखे काम करु शकत नाही”, असे कंगनाने यावेळी सांगितले.

पुढे ती म्हणते, “पंतप्रधान नरेंद्र यांच्यामुळे मला काम करण्याची प्रेरणा मिळते. ते ज्या पद्धतीने त्यांचे काम करतात, जबाबदारी पार पाडतात ते पाहून मला बरेच काही शिकायला मिळते. टिकांकडे लक्ष न देता आपण आपले काम करत रहायचे हे मी त्यांच्याकडून शिकले. मात्र त्यांच्याशी मी माझी तुलना करत नाहीये”.