विधानमंडळाची अंदाज समिती महापालिकेत येणार..

0
338

पिंपरी, दि. २० (पीसीबी) महाराष्ट्र राज्य विधानमंडळ अंदाज समितीच्या तीन दिवसीय पुणे जिल्हा दौऱ्याला आजपासून प्रारंभ झाला असून उद्या शनिवारी (दि. 21) रोजी ही समिती पिंपरी-चिंचवड महापालिकेत येणार आहे. समितीने तब्बल 17 विषयांची माहिती मागविली असून त्यामध्ये अनेक गंभीर विषयांचा समावेश आहे. या विषयांबाबत समिती काय निर्णय घेणार आणि कोणत्या वादग्रस्त विषयांची चौकशी जाहीर करणार याकडे लक्ष लागले असून काहीजणांचे “धाबे दणाणले’ आहेत.

राज्यभरातील कोणत्याही कामाची पाहणी करणे. चौकशी करणे. माहिती घेणे याचे अधिकार असलेली महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाची 35 आमदारांची अंदाज समिती सध्या तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहे. पुणे जिल्ह्यातील महसूल, मदत व पुनर्वसन, अन्न नागरी पुरवठा. वैद्यकीय, उद्योग, उर्जा व कामगार यासह पीएमआरडीए, पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेअंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांना भेटी देणार आहे. तसेच या दौऱ्यादरम्यान ज्या कामांबाबत आरोप झाले आहेत. संशय व्यक्त करण्यात आला आहे त्याबाबत माहितीही घेणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 17 कामांची माहिती या समितीने मागविली आहे. गेल्या वर्षभरात ज्या कामांवर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत त्यातील बहुतांश कामांची माहिती या समितीने मागविल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. अंदाज समिती या माहितीबाबत काय निर्णय घेणार आणि कोणत्या विषयांची चौकशी लावणार याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.
समितीने माहिती मागविलेल्या विषयांमध्ये पवना नदीवर उभारण्यात येणारे सांडपाणी प्रकल्प, कोविडमधील भ्रष्टाचार, रस्ते सफाई कामांची निविदा, मोशी कचरा डेपोला लागलेली आग, महिला प्रशिक्षण, श्वान निर्बिजीकरण, श्वान निर्बिजीकरण केल्यानंतर उचलण्यात आलेला बायोमेडिकल कचरा, स्मार्ट सिटी अंतर्गत 250 कोटींची व 150 कोटींची जी निविदा एल ऍण्ड टी व महिंद्रा कंपनीला देण्यात आली त्याची संपूर्ण माहिती, ड प्रभागाच्या स्थापत्य विभागाने केलेले रस्त्याचे काम, वाहन चालक पगार, मोबाइल टॉवर, रस्ते खोदाई परवानगी. 15 लाख मास्क खरेदी, सीसीटीव्ही निविदा, टीडीआर तसेच जागेच्या आरक्षणांच्या प्रस्तावाचा यामध्ये समावेश आहे.