झी टॉकीज वरील छत्रपती संभाजीराजे यांच्या चरित्र कथेला उदंड प्रतिसाद

0
267

व्याख्याते गणेश शिंदे व सुप्रसिद्ध गायिका सन्मिता शिंदे यांचे अप्रतिम सादरीकरण

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ भोसरी व झी टॉकीज यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील अंकुशराव लांडगे सभागृह छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवन चरित्रावर आधारित संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी संभाजीराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग श्रोत्यांसमोर मांडले आहेत. गेली अनेक वर्ष संभाजी राजांना अनेक नाटककार कथाकार यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात नेऊन ठेवले. संभाजी राजांचा खरा इतिहास येणाऱ्या पिढीसमोर येणे गरजेचे आहे. युद्धकौशल्य, ढाल तलवार यांच्या पलीकडे जाऊन विविध भाषांचे ज्ञान आत्मसात करणारे, बुधभूषण हा ग्रंथ लिहिणारे, शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करणारे, आणि उत्तम प्रशासन सांभाळत असताना एकाच वेळी 12 शाह्यांशी दोन हात करणारे संभाजी राजे आपण समजून घ्यावेत यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे व्याख्याते गणेश शिंदे यांनी सांगितले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला संगीताची जोड आहे. संभाजी राजे यांच्या जीवनातील प्रसंग यांना साजेसे अभंग भावगीते पोवाडे यांचा सुंदर मिलाफ या कार्यक्रमात पाहायला मिळतो. कलर्स मराठी वरील सुर नवा ध्यास नवा या कार्यक्रमातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या सौ सन्मिता शिंदे यांनी आपल्या गायनाने या कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.

व्याख्याते गणेश शिंदे यांच्या वक्तृत्वाची दमदार शैली व इतिहास मांडत असताना सद्य परिस्थितीचे भान, त्यांची विनोदबुद्धी यामुळे हा कार्यक्रम श्रोत्यांना भावत आहे.

या कार्यक्रमाचे प्रक्षेपण दिनांक 14 मे पासून 20 मे पर्यंत रोज सकाळी साडेसात ते साडेनऊ वाजेपर्यंत झी टॉकीज या वाहिनीवर होणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भोसरी चे प्रथम आमदार विलास लांडे व झी टॉकीजचे हेमंत पांचाळ यांनी केले आहे.