वाहतूक व्यावसायिकांना सरकराने मदत करावी – सचिन साठे

0
347

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – प्रवासी व माल वाहतूक करणा-या व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशीही मागणी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात साठे म्हणताता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च 2020 रोजी अचानक देशभर लॉकडाऊन करण्याचा आदेश दिला. त्यामुळे कोट्यावधी व्यावसायिक वाहने आहे त्या परिस्थितीत रस्त्यांवर अडकून पडली. यातील कित्येक वाहनचालक भितीपोटी व उपासमारीच्या भीतीने माल भरलेली वाहने रस्त्यावरच सोडून निघून गेली आहेत. शेकडो वाहनातील मुद्देमालाची चोरी झाली आहे. त्याची नुकसान भरपाई या माल वाहतुक व्यावसायिकांना भरावी लागणार आहे. लॉकडाऊन काळाता व्यवसाय पूर्ण बंद आहे, परंतू सर्व व्यावसायिक वाहनांना जेव्हा वार्षिक नूतनीकरण करण्यासाठी परिवहन कार्यालयात जावे लागेल तेव्हा या काळातील देखील सर्व प्रकारचे कर भरावे लागतील. वाढणा-या पेट्रोल व डिझेलच्या किंमतीमूळे प्रवासी व माल वाहतूक करणारे व्यावसायिक अगोदरच अडचणीत आहेत तर लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

शहरी भागात अंतर्गत प्रवासी वाहतूक करणा-या रिक्षा, ओला, ऊबेरसारख्या प्रवासी वाहतूक करणा-या टॅक्सी, आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक करणा-या लक्झरी बसेस, कामगारांची प्रवासी वाहतूक करणा-या बसेसच्या मालकांना राज्य सरकारने मदतीचा हात देणे आवश्यक आहे.पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबादसारख्या शहरांमध्ये लाखो नागरिक रिक्षा व ओला, ऊबेरचा व्यवसाय करतात. त्यांचे उत्पन्नाचे साधनच लॉकडाऊनमुळे बंद होते. हातावर पोट असणा-या या लाखो कुटुंबांना सरकारने मदत करणे आवश्यक आहे. त्यासाठी लॉकडाऊन काळातील राज्य सरकारचे सर्व कर माफ करावेत आणि राज्यातील या लाखो प्रवासी व माल वाहतूक करणा-या व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशीही मागणी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली आहे.