वाल्हेकरवाडीत एका सोसायटीच्या पार्किंग मधून 30 हजारांची देशी-विदेशी दारू जप्त

0
1032

चिंचवड, दि. ८ (पीसीबी) – वाल्हेकरवाडी येथील एका सोसायटीच्या पार्किंग मधून पोलिसांनी 30 हजारांची देशी-विदेशी दारू जप्त केली आहे. तसेच चौघांवर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून एक चार आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाने गुरुवारी (दि. 6) रात्री केली.

दादासाहेब भीमराव चोपडे (वय 42, रा. बिजलीनगर, चिंचवड) आणि त्याच्या तीन साथीदारांच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी येथील एका सोसायटीच्या पार्किंग मध्ये असलेल्या एका कारमध्ये दारूसाठा असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा छापा मारून कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी एक हजार 80 रुपये रोख रक्कम, 30 हजार 120 रुपयांच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या आणि सात लाख रुपये किमतीची एक ब्रेजा कार (एम एच 14 / जे ए 3092) असा एकूण सात लाख 31 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी लॉकडाऊनच्या कालावधीत बेकायदेशीरपणे दारू विकत होते. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.