वाराणसीमध्ये गुजराती आणि महाराष्ट्रातील लोकांना वाराणसी सोडून जाण्याची धमकी

0
992

वाराणसी, दि. १० (पीसीबी) – गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर होत असलेल्या हल्ल्यामुळे देशातील राजकीय वातावरण तापले आहे. वाराणसीमध्ये तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात पोस्टर्स लावण्यात आले आहेत. ‘गुजराती नरेंद्र मोदी बनारस छोडो’ असे या पोस्टर्सवर लिहिले आहे. वाराणसी हा पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

गुजरात येथील साबरकांठा जिल्ह्यात १४ महिन्याच्या मुलीवर बलात्काराची घटना घडल्यानंतर बिगर गुजरातींवर हल्ले करण्यात आले. यामध्ये बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील लोकांना लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे बाहेरील राज्यातील लोकांना गुजरात सोडण्यास भाग पडले आहे. याचा विरोध करण्यासाठी उत्तर प्रदेश-बिहार एकता मंचने वाराणसीमध्ये ‘गुजराती नरेंद्र मोदी बनारस छोडो’ हे पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टर्समध्ये गुजरात, महाराष्ट्रात उत्तर भारतीयांवर होत असलेल्या हिंसेचा विरोध करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश-बिहार एकता मंचने लावलेल्या पोस्टर्समध्ये म्हटलय की, वाराणसीमध्ये राहत असलेल्या सर्व गुजराती आणि महाराष्ट्रातील लोकांनी एका आठवड्याच्या आत वाराणसी सोडून जावे. नाहीतर याचे परिणाम भोगण्यास तयार राहावे.