वादळ शमले

0
844

दत्ता साने उर्फ काका नावाचे वादळ शमले. त्यांची अशी एक्झिट होईल हे कोणालाच पटत नाही. त्यांना कोरोनाची बाधा झाली याची बातमी आली तेव्हाच थोडी पाल चुकचुकली. लोक म्हणत तो निधड्या छातीचा आहे, वाघाचा बछडा आहे, आठ-दहा दिवसांत परतेल. झाले भलतेच. ते सिरियस आहेत असे दोन दिवसांपूर्वी समजले. बिर्ला हॉस्पिटल आहे मग काळजी नाही, अशी मनाची समजूत करून घेतली. आज सकाळ थेट ते गेल्याची बातमी धडकली. पाच-दहा मिनिटांत धडाधड मेसेजेस फिरू लागले. कारण सर्वांसाठी हे धक्कादायक होते. विशेषतः राजकीय कार्यकर्त्यांना मोठा शॉक होता. नागरिकांसाठी अत्यंत दुखद होते. महापालिकेतील विरोधक आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस तर गर्भगळीत झाली. कारण विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी केलेल्या कामामुळे किमान इथे विरोधीपक्ष जिवंत दिसला. दत्ता साने यांनी महापालिकेत उपस्थित केलेले विविध विषय, त्यासाठी निर्माण केलेला दबाव, भाजप विरोधातील पवित्रा कायम दिसत होता. त्यांचे नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व याच किमान चिखली परिसरात कोणी त्यांचा हात धरू शकत नव्हते. सलग तीन वेळा निर्विवाद जिंकले ही त्यांच्या कामाचीच पावती होती. त्यांचे ते मोठेपणे कोणीच नाकारू शकत नाही. राष्ट्रवादीने एक हिरा गमावला आहे. विकास कामाचा धडाका, लोकसंपर्क, कार्यक्रमांची रेलचेल असे एक समिकरण म्हणजे दत्ता साने. संत पिठाच्या निर्मितीसाठी त्यांनी जो पाठपुरावा केला ते किमान वारकरी, धारकरी विसराणार नाहीत. चिखली पंचक्रोशितील रस्ते, पाणी, वीज असो वा बाजारपेठेचा प्रश्न त्यांची त्यात तळमळ दिसे. महापालिका सभागृहातील त्यांचा रुद्रावतार हे सुध्दा त्यांचे एक विशेष होते. कुठे थांबायचे कुठे आक्रमण करायचे याची पुरेपूर जाण त्यांना होती. त्यामुळेच राष्ट्रवादीची छाप पडली. अगदी काल परवाचा प्रश्न घ्या. शहरातील अवैध बांधकामांची शास्ती माप होत नाही तोवर जनतेने कर भरू नये, असे म्हणायचे धाडस फक्त त्यांच्याकडेच होते. लोकांचे मोहळ त्यांच्या मागे होते त्याचे कारणचते होते. चिखली हा भागच मुळात सामान्य कामगार, कष्टकरी जनतेचा. जवळपास ९० टक्के अवैध बांधकामे झाली त्यांनीही पूर्ण आशिर्वाद काकांचाच होता. त्यामागची भावना फक्त मतांची पेटी नव्हती तर गोरगरिबांप्रती असलेली तळमळ होती. कोरोनामुळे अंत्यसंस्काराला उपस्थितीसाठी बंदी होती, पण जो अथांग जमसमुदाय लोटला होता तोच मुळी बोलका होता.

राजकारणात अल्पावधीत त्यांनी मोठी मजल गाठली. कारण कुठलाही प्रश्न त्यांच्याकडे घेऊन जाणारा कधी निराश होऊन परतला नाही. त्यामुळे आणखी पुढचा टप्पा गाठायचे त्यांचे स्वप्न होते,ते मात्र अधुरेच राहिले. विलास लांडे यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची सुरवातीची प्रतिमा होती. हवेली आणि नंतर भोसरी विधानसभा लांडे यांनी जिंकली त्यात सिंहाचा वाटा दत्ता साने यांचा होता. नंतर लांडे यांच्याबरोबर काडीमोड घेतली आणि महेश लांडगे यांच्या मागे काका उभे राहिले तेव्हा (२०१४) महेश दादांचा विजय सुकर झाला होता. म्हणजे एक प्रकारे राजकारणातले खिलाडी होते. ते सुत्रधाराच्या भूमिकेत राहिले पण प्रत्यक्षात खरे सुत्रधार झाले नाहीत याची रुखरुख त्यांच्या समर्थकांना आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत त्यांनी भाजपला नाकी नऊ आणले म्हणून ते टिकले. विरोधीपक्ष नेता म्हणून ते पायऊतार झाले आणि विरोधी पक्ष गारद झाला. राष्ट्रवादीने त्यांना दुसऱ्यांदा संधी द्यायला हवी होती. स्मार्ट सिटी प्रकल्पातील भ्रष्टाचारावर त्यांनी रान उठवले होते, पण कुठेतरी माशी शिंकली आणि त्यांनाच बाजुला व्हायची वेळ आली. जसजसे त्यांचे क्षेत्र विस्तारत गेले तसतसे राजकीयदृष्ट्या ते परिपक्व झाले म्हणून लोकांना भावले. शिवसेना स्टाईलने वादळ अंगावर घ्यायचे, वादळ निर्माण करायचे हा काकांचा खाक्या. खरे तर, ते शरद पवार हे त्यांचे दैवत, अजित पवार हे मार्गदर्शक. त्यांनी मनात आणलेच असते तर काकांना आमदारकी अशक्य नव्हती. आपली किंमत होत नाही, असे वाटल्याने मध्यंतरी अगदी स्वभावानुसार त्यांनी थेट शिवसेनेचा दरवाजाही ठोठावला होता. शेवटी राजकारण हा सापशिडीचा खेळ आहे. एक एक घर जिंकत जिंकत मोठ्या कष्टाने त्यांनी हा खेळ जिंकला, पण शेवटी नशिबाने दगा दिला. काकांसारखा एक नेतृत हे चिखलीकरांसाठी आधारवड होते. त्यांच्या अपेक्षापूर्ती ही आता राष्ट्रवादीची आणि सर्व राजकीय मंडळींची जबाबदारी आहे. तिच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल.