अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेला खिंडार पाच शिवसेना नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

0
415

पारनेर, दि. ४ (पीसीबी) – राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आघाडी सरकार असताना खाली गाव अथवा तालुका पातळीवर मात्र एकमेकांचे पक्ष फोडाफोडी सुरू आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष फोडण्याचे काम थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. पारनेरच्या पाच शिवसेना नगरसेवकांनी बारामती मध्ये जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. थेट मुख्यमंत्र्यांचाच पक्ष फोडण्याची करामत राष्ट्रवादीने केल्याने शिवसेनाही संभ्रमात आहे.

पारनेरचे नगरसेवक मुदस्सर देशमुख, नंदकुमार देशमुख, किसन गंढाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आपल्या प्रवेशाचे कारण सांगताना शिवसेनेतील गटबाजीचे कारण त्यांनी दिले आहे. राष्ट्रवादीचे नेते निलेश लंके म्हणाले, विधानसभा निवडणुकिनंतर ही खदखद सुरू होती. ते सर्वजण भाजपमध्ये जाणार होते, त्यांच्या दोन बैठका झाल्या होत्या, पण मी त्यांना राष्ट्रवादीत आणले. शिवसेनेतील नेत्यांबद्दल त्यांच्या मनात खदखद होती. त्यांना माझ्या नेतृत्वाखाली काम करायचे होते म्हणून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे अन्यथा ते इकडे नाही तर ते भाजपमध्ये गेले असते.

अहमनगर जिल्ह्यातील शिवेसनेचे नेते माजी आमदार अनिलभैया राठोड म्हणाले, अत्यंत चुकिची ही पध्दत आहे. वर सरकार एकत्र असताना हे प्रवेश व्हावेत याचे वाईट वाटते. तिघे एकत्र असताना पाच नगरसेवक घऊन गेले, त्यांचा मी निषेध करतो. शिवसेनेत नाराजी नाही, उध्दव ठाकरे चांगले काम करत आहेत. निष्ठावंत शिवसैनिक तिकडे जाऊच शकत नाहीत.

प्रत्येक पक्षाला त्यांचा पक्ष वाढविण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सांगितले.