‘वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची’

0
325

नाशिक, दि. १० (पीसीबी) : वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उत्तर दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिल्याश आम्ही वाघाशी म्हणजेच शिवसेनेशी मैत्री करायला तयार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी नाशिकमध्ये ही प्रतिक्रिया दिली. संजय राऊत पक्षबांधणीच्या निमित्ताने पाच दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयावर भाष्य केलं.

चंद्रकांतदादा गोड माणूस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, अशा शुभेच्छा संजय राऊत यांनी दिल्या.

पंतप्रधानांनी राजकीय प्रचारच करु नये
नरेंद्र मोदी हे भाजपा आणि देशाचे मोठे नेते आहेत. जे यश भाजपला प्राप्त झालं आहे ते त्यांच्या चेहऱ्यामुळेच आहे. पण पंतप्रधान हे देशाचे असतात, त्यांनी राजकीय प्रचार करु नये. कोणत्याही पक्षाचा प्रचार करु नये. ते देशाचे पंतप्रधान आहेत. फोटो वापरणे हे कार्यकर्त्यांवर असतं. बाळासाहेबांचा फोटो वापरला जातो, वाजपेयींचा वापरा जात होता. हे असं ठरवून होत नाही, लोकांच्या मनात तो नेता असतो, असं संजय राऊत म्हणाले.

विधानसभेला 100 पार
एकमेकांचं लक्ष असतं विधानसभेवर. आम्हांलाही वाटतं की आमचा आकडा विधानसभेवर 100 पार जावा. त्यासाठी आतापासून प्रयत्न सुरु आहेत. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. तिन्ही पक्ष आपआपल्या पक्षासाठी काम करत आहेत. ते गरजेच आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

मालाड दुर्घटना दुर्दैवी
मालाड इमारत दुर्घटना दुर्दैवी आहे. टीका करणाऱ्यांना करु द्या, स्वत: मुख्यमंत्री काल रस्त्यावर उतरले. सगळेच काल रस्त्यावर उतरले होते. टीका करणाऱ्यांना काय? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते?
“वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत. आमची दुश्मनी कधीच नव्हती. आमच्या नेत्याची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा असते. जर मोदीजींनी तशी इच्छा व्यक्त केली, तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही तयार आहेच”, असं चंद्रकांत पाटील काल पुण्यात म्हणाले होते.

वाघाशी दोस्ती करावी यासाठी मला वाघ भेट दिला, पण वाघाशी आमची दुश्मनी कधीच नव्हती. उद्धवजीं जुनी मैत्री मोदीजींशी आहे असं सांगितलं. त्यांचं म्हणणं फडणवीस-पाटलांशी जमत नाही. इकडे दोस्ती असती तर 18 महिन्यापूर्वीच सरकार आलं असतं. मोदींनी जर सांगितलं, त्यांची इच्छा असेल तर त्यांची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा असते, असं चंद्रकात पाटील यांनी नमूद केलं होतं.