‘नवनीत राणा यांच्यावर लोकसभा सभापतींनी कारवाई करावी’

0
422

अमरावती, दि. १० (पीसीबी) – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचं न्यायालयाने जात प्रमाणपत्र रद्द केलं आहे. त्यामुळे त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे. उच्च न्यायालयाने खासदार नवनीत राणा यांनी कॉन्स्टिट्युशन फ्रॉड केल्याचं म्हणत त्यांना दोन लाख रुपये दंड आणि सहा आठवड्यात सर्व प्रमाणपत्रक जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
नवनीत राणा यांच्या बनावट जात प्रमाणपत्रावर मी सुरुवातीपासूनच आक्षेप घेऊन आवाज उठविला आहे. यापुढेही सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करणार असल्याचं अडसूळ यांनी सांगितलं आहे. खोटीनाटी प्रमाणपत्रे सादर करून त्यांनी निवडणूक लढवली. मात्र, नवनीत कौर यांचा ढोंगीपणा नुकताच उघड झाला आहे, असं आनंदराव अडसूळ म्हणाले.
उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कालच दिला आहे. आता नवनीत राणा यांच्यावर लोकसभा सभापतींनी कारवाई करावी. नवनीत राणा यांच्याप्रकरणी राष्ट्रपती, पंतप्रधान यांनाही पत्र पाठवणार आहे. त्याचबरोबर पुढेही आपली कायदेशीर लढाई सुरूच राहील, असं अडसूळ म्हणाले आहेत.
दरम्यान, अमरावती हा लोकसभेसाठी एससी राखीव मतदार संघ होता. जात प्रमाणपत्र असल्याशिवाय खासदारकी कायम राहत नाही. त्यामुळे आता त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे. नवनीत राणा यांच्यानंतर दुसरा क्रमांकावर शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ होते. त्यामुळे खासदारकी रद्द झाली तर अडसूळ यांना खासदारकी मिळण्याचं बोललं जात आहे.