“वयासोबत परिपक्वता वाढावी”, आशिष शेलार यांच्या संजय राऊतांना खोचक शुभेच्छा

0
652

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – वयासोबत परिपक्वता वाढावी असा टोला लगावत भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना वाढदिवसानिमित्त खोचक शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच ठाकरे आणि मोदींमध्ये विसंवाद निर्माण करण्यासाठी संजय राऊतच जबाबदार असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. मंदिराची शपथ घेऊन असत्य पसरवणे मान्य नाही अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. शिवसेनेचा मोदींबदला आदर स्वाथी की नि:स्वार्थी असा सवाल यावेळी त्यांनी विचारला.

आशिष शेलार यांनी अमित शाह यांच्या मुलाखतीचा उल्लेख करत, त्यांनी मांडलेली भूमिका सत्य असल्याचे सांगितले. “अमित शाह यांनी कोणाला खोटे पाडण्यासाठी नाही तर सत्य समोर आणण्याचे काम केले आहे. अमित शाह यांनी मांडलेली भूमिका सत्य आहे. सत्य सांगितल्यावर काहींची अडचण होत असेल तर आम्ही काही करु शकत नाही. राजकीय स्वार्थापपोटी असत्य पसरवणे अमान्य आहे,” असे आशिष शेलार यांनी यावेळी म्हटले.

संजय राऊत यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शाह हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवसेनेपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. मोदींचे बाळासाहेबांबरोबर खास नातं होतं. हे नातं ते पंतप्रधान होण्याआधीपासूनचं होतं. आता कोणीतरी मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये फूट पाडू पाहत आहे असा आरोप राऊत यांनी केला होता. यावर बोलताना आशिष शेलार यांनी विसंवाद निर्माण करण्याचं काम कोण करते हे संपूर्ण महाराष्ट्र रोज सकाळी दूरचित्रवाणीवरुन पाहतो अशी टीका संजय राऊत यांच्यावर केली.