‘वणवण फिरला पण, बेड नाही मिळाला, शेवटी बसस्थानकावरच तडफडून प्राण सोडला’

0
323

चंद्रपूर, दि.१९ (पीसीबी) : चंद्रपूर जिल्ह्यात एक हेलावून टाकणारी घटना घडली आहे. जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे एका कोरोनाग्रस्ताचा उपचार न मिळाल्यामुळे बसस्थानकावरच मृत्यू झाला आहे. बसस्थानकावरच या रुग्णाने तडफडून प्राण सोडला आहे. शनिवारी (17 एप्रिल) संध्याकाळी हा संतापजनक प्रकार घडला.

दिवसभर वणवण पण बेड मिळाला नाही
मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदा निकेश्वर (50) यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर त्यांनी स्वत:च्या उपचारासाठी रुग्णालयात भरती होण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांना जिल्ह्यातील आंभोरा येथून ब्रम्हपुरी येथील कोविड रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, येथेसुद्धा बेड शिल्लक नव्हते. शेवटी वणवण फिरूनही त्यांना उपचारासाठी बेड मिळाला नाही.

शेवटी बसस्थानकावर प्राण सोडला
दिवसभर वणवण करुनही गोविंदा निकेश्वर यांना उपचारासाठी कोणत्याही रुग्णालयाने भरती करुन घेतले नाही. बेड शिल्लक नसल्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यास नकार देण्यात आला. शेवटी रात्र होत असल्यामुळे निकेश्वर हे ख्रिस्तानंद रुग्णालयासमोर असलेल्या बस स्टॉपवर गेले. तेथे त्यांनी आसरा घेतला. मात्र, तेथेच त्यांचा उपचारावीना मृत्यू झाला.

दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुरेसे मनुष्यबळ नसणे, औषधांचा, ऑक्सिजनचा तुटवडा, तसेच बेड उपलब्ध नसल्यामुळे शेकडो कोरोनाग्रस्तांचा उपचारावीना मृत्यू होत आहे. हा प्रकार राज्यात सर्वत्र घडत असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. तसेच राज्याचे आपत्ती व्यवस्थापनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघातच हा प्रकार घडल्यामुळे राज्य सरकारवर सर्वत्र टीका होत आहे.