लोकसभेनंतर कोणता नेता कशामुळे भाजपमध्ये गेला, हे कागदपत्रांसह सांगतो – अजित पवार

0
678

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावर एका वृत्तवाहिनी बोलताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मोठा खळबळजनक दावा केला आहे.  लोकसभा निवडणूक  पार पडू द्या, कोणता नेता कशामुळे पक्ष सोडून भाजपमध्ये गेला,  ते कागदपत्रांसह सांगतो,  असे पवार यांनी म्हटले आहे.   

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर  विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी  भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ही नेतेमंडळी पक्ष का सोडून गेली, याची कागदपत्रासह माहिती देतो , असा दावा पवार यांनी केला आहे. तिकीट नाकारल्यामुळे यांनी पक्ष बदललेला नसून सरकारकडून दबाव आल्यामुळे तर काहींनी डोक्यावर शेकडो कोटींच्या कर्जाचा डोंगर असल्यामुळे त्यांनी पक्ष सोडला आहे, असे पवार यांनी सांगितले.

प्रत्येक जण पक्ष सोडून का गेला, त्यामागील कारण काय  होते, कुणाच्या पाठीमागे कोणता ससेमिरा लावण्यात आला होता, हे कागदपत्रांसह सांगतो. तसेच  कुणाला आपला कारखाना वाचवायला पैशाची मदत हवी होती म्हणून ते गेले.  तर काहींच्या पतसंस्था, कारखाने अडचणीत आलेले होते. डोक्यावर कर्ज होते म्हणून त्यांनी सत्ताधारी पक्षाचा आश्रय घेतला, असे पवार म्हणाले.