लोकसभेच्या निकालानंतर मायावती भाजपसोबत युती करणार; बसपाच्या माजी नेत्याचा दावा  

0
466

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात बसपाच्या प्रमुख मायावती  पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्ला चढवत आहेत. मात्र, लोकसभेच्या निकालानंतर मायावती भाजपसोबत युती करतील, असा दावा बसपाचे माजी नेते नसिमुद्दीन सिद्दीकी यांनी करून खळबळ उडवून दिली आहे.  

नसिमुद्दीन म्हणाले की, मी मायावती यांना त्यांच्या स्वत:पेक्षा जास्त चांगले ओळखतो. राजकारणात काहीही अशक्य नाही. मायावती यांनी याआधीही भाजपशी हातमिळवणी केली आहे. २३ मे ला निकालानंतर  मायावती यांच्यावर दबाव निर्माण  केला जाईल, त्यानंतर त्या स्वत: महागठबंधनला फाट्यावर मारून भाजपसोबत युती करतील.

दरम्यान, नसिमुद्दीन सिद्दीकी  यांनी मायावतींसोबत बसपामध्ये ३३ वर्षे काम केले आहे. परंतु गेल्यावर्षी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.  सिद्दीकी यांनी  मायावती भाजपसोबत गेल्यास समाजवादी पक्ष काँग्रेससोबत आघाडी करेल, असेही म्हटले आहे. दरम्यान, लोकसभा निकालानंतर कोणती समीकरणे आकाराला येतात, आणि कोण सत्तेवर येणार हे पाहणे  महत्वाचे ठरणार आहे.