लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मनसेची ताकद दिसून येईल – शरद पवार

0
530

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – कोणत्याही व्यक्ती पक्षातून गेली म्हणजे पक्ष संपला, असे होत नसते,  राज ठाकरे यांच्या मनसेची ताकद  राज्यात आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधनासभा निवडणुकीत मनसेची ताकद दिसून येईल, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

जुन्नरचे मनसेचे एकमेव आमदार  शरद सोनावणे यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे राज्यात मनसेकडे एकही आमदार  नसल्याची टीका होऊ लागली आहे. मुंबई, नाशिकमध्ये काही नगरसेवक आता मनसेकडे आहेत.

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मनसेबाबत भाष्य केले आहे. राज ठाकरे यांच्याकडे तरुणवर्ग आकर्षित होत आहे. त्यामुळे मनसेकडे एकही आमदार नसला, तरी  भविष्यात मनसेची ताकद पुन्हा दिसून येईल.  येत्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे आकडे वाढलेले दिसून येतील, असे पवार म्हणाले.