तुम्ही मला काय विचारणार आहात, हे माहीत आहे; पार्थ पवारांनी माध्यमांना टाळले

0
789

पुणे, दि. १३ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र, प्रचारादरम्यान पार्थ पवार माध्यमांशी बोलणे टाळत आहेत. तुम्ही मला काय विचारणार आहात हे माहीत आहे, असे सांगून ते  माध्यमांपासून लांब राहत आहेत.

पार्थ पवार यांनी आज (बुधवार) सकाळी एकवीरा देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पिंपरी चिंचवडमधील मेळाव्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शरद पवार यांनी बुथप्रमुखांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत असताना पार्थ यांनी उपस्थिती लावली. त्यानंतर पार्थ पवार महाड येथे गणपतीच्या दर्शनाला गेले. खोपोली आणि कर्जतमध्येही पार्थ पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी  माढातून लोकसभा लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी पार्थ यांच्यासाठी माढ्यातून उमेदवारी मागे घेतली असल्याचे बोलले जात आहे.  पार्थ यांचे चुलत बंधू रोहित पवारांनी  शरद पवारांना निर्णयाचा फेरविचार करण्याचे आवाहन केले. त्यामुळे पवार घराण्यातील तिसऱ्या पिढीत राजकीय स्पर्धा सुरु झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. यामुळेच पार्थ पवार माध्यमांना टाळत असावेत.