“लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना विचारवंत गप्प!” – डॉ. बाबा आढाव

0
89

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – “देशात आणि राज्यात लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना विचारवंत भीष्माचार्यांसारखे गप्प बसून आहेत!” असे परखड विचार कष्टकरी कामगारांचे नेते डॉ. बाबा आढाव यांनी विज्ञान केंद्र प्रेक्षागृह, ऑटोक्लस्टरसमोर, चिंचवड येथे बुधवार, दिनांक २७ डिसेंबर २०२३ रोजी व्यक्त केले. इंद्रायणी साहित्य परिषद आणि गुरुकुल प्रतिष्ठान आयोजित तसेच ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे लिखित ‘अस्वस्थ मनाची वेदना’ या वैचारिक लेखसंग्रहाचे प्रकाशन डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, सर्व श्रमिक संघटना – पुणे सरचिटणीस मेधा थत्ते, ज्येष्ठ साहित्यिक सोपान खुडे, विज्ञान केंद्र संचालक प्रवीण तुपे, लेखक अरुण बोऱ्हाडे आणि इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती; तसेच साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.

डॉ. बाबा आढाव पुढे म्हणाले की, “समाजातील सामुदायिक वेदनेचा उच्चार अरुण बोऱ्हाडे यांनी आपल्या पुस्तकातून केला आहे. सद्य:स्थितीत जे काही चालले आहे ते आपल्या बुद्धीला पटते आहे का, हा प्रश्न मनाला विचारा. विद्रोह हा माणसाचा स्थायिभाव आहे. त्यातून सांस्कृतिक पातळीवर परिवर्तन होणे गरजेचे आहे. त्यासाठी तळागाळातील माणसांशी सामुदायिकपणे संवाद साधला पाहिजे!” आपल्या मनोगताचा समारोप त्यांनी ‘भारतीय संविधानाचा विजय असो!’ असा त्रिवार जयघोष करीत केला.

मानव कांबळे यांनी, “समाजातील समस्या पाहून जो अस्वस्थ होत नाही तो सामाजिक कार्यकर्ता नव्हे; तसेच वास्तवातील प्रश्न ज्याच्या साहित्यात उमटत नाहीत तो साहित्यिकच नव्हे. अरुण बोऱ्हाडे यांच्या लेखनात सामाजिक अस्वस्थता प्रतिबिंबित झाली आहे; परंतु याची दोषनिश्चितीसुद्धा झाली पाहिजे!” अशी अपेक्षा व्यक्त केली. देशातील प्रश्नांवर कार्यकर्त्यांनी सामुहिक चिंतन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

मेधा थत्ते यांनी राजकीय परिस्थितीवर मार्मिक टीकाटिप्पणी करीत, “या देशातील प्रत्येकाला आर्थिक स्थैर्य मिळावे, अशी अपेक्षा लेखकाने व्यक्त केली असली तरी ती राज्यकर्त्यांसाठी जाचक आहे!” असे मत मांडले. राजकीय गद्दारांना आता जनताच धडा शिकवेल, असेही त्या म्हणाल्या.

लेखक अरुण बोऱ्हाडे यांनी आपल्या मनोगतातून, “समाजातील सर्व क्षेत्रांत असुरक्षित वातावरण आहे. सर्वसामान्य माणसाला मूलभूत सुविधांसाठी पावलागणिक पैसे मोजावे लागतात; परंतु शासनाने आपली जबाबदारी झटकून टाकली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिक म्हणून आपणच कमी पडतो आहोत का?” अशी खंत व्यक्त केली. मोशी येथील पिढीजात शेतकरी दत्तोबा सस्ते यांनी टोपलीतून आणलेल्या शिदोरीचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करीत ‘अस्वस्थ मनाची वेदना’ या पुस्तकाचे अभिनव पद्धतीने प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी पुस्तक निर्मितीत सहकार्य करणाऱ्या जयवंत फाळके आणि चार ज्येष्ठ पत्रकारांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. तसेच इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने गीतांजली बोऱ्हाडे आणि अरुण बोऱ्हाडे या दांपत्याचा हृद्य सन्मान करण्यात आला. इंद्रायणी साहित्य परिषद आणि गुरुकुल प्रतिष्ठान यांच्या पदाधिकाऱ्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. संतोष घुले यांनी सूत्रसंचालन केले. संदीप तापकीर यांनी आभार मानले.