लॉकडाऊन 4 कसा असू शकतो…

0
249

मुंबई, दि. १६ (पीसीबी) : देशातील कोरोनाचा वाढता कहर पाहता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन 4 ची घोषणा केली आहे. सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊन 3 ची मुदत 17 मे रोजी संपणार आहे. मात्र त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन 4 ची घोषणा करताना हा लॉकडाऊन वेगळा असेल आणि त्याचे नियम 18 मे पूर्वी सांगितले जातील असं जाहीर केलं. त्यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राज्य सरकारकडून रणनीती आखण्यासाठी बैठकांचं सत्र सुरु आहे. लॉकडाऊन 4 कसा असू शकतो, त्याचे नियम काय असू शकतात, कोणाला सूट मिळू शकते, उद्योग व्यवसायांचं काय? याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रिमंडळ आणि तज्ज्ञांशी चर्चा करत आहेत.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही राज्यातील सर्व पार्श्वभूमी पाहता, 18 मेनंतर राज्यात कोणते नियम असू शकतात याबाबत अंदाज व्यक्त केले. त्यानुसार ग्रीन आणि ऑरेंज झोनला निश्चितच अनेक मोठ्या पद्धतीच्या सवलती 18 मे नंतर दिल्या जातील. ग्रीनमध्ये सीमा बंद करुन सर्व व्यवसाय सुरु केले जातील, असा माझा अंदाज आहे. ऑरेंजमध्ये ज्या इंडस्ट्री आहेत. त्या सुरु केल्या जातील. तसेच सर्व व्यवसायही तत्परतेने सुरु होतील. रेडमध्ये काय करायचं काय नाही हे केंद्र सरकारची सूचना येईल. पंतप्रधानांनी सर्वांना लॉकडाऊन कसं उघडावं याच्या सूचना मागवल्या आहेत.
कंटेन्मेंट झोनच्या बाहेर अत्यंत महत्त्वाच्या बाबी सुरु करता येतील का हे मुख्यमंत्री स्तरावर ठरवलं जाईल. ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील काही नियम शिथील होतील. मात्र मुंबई रेड झोन असल्याने या ठिकाणी मुंबईतील लॉकडाऊन लवकर उठवला जाईल असं मला वाटत नाही. मुंबई रेड झोनमध्ये आहे, त्यामुळे रेड झोनचा लॉकडाऊन लगेच उठेल असं मला वाटत नाही. ऑरेंज झोनमध्ये जे कंटेन्मेंट झोन आहेत, त्या व्यतिरिक्त भागात स्वतंत्र दुकाने जी गर्दीत नाहीत, रजिस्ट्रीची कामे सुरु करता येतील, महसूल, गाड्यांची खरेदी विक्री सुरु होईल, गाड्यांचं रजिस्ट्रेशनमधून सरकारला महसूल सुरु होईल. जी वैयक्तिक दुकाने आहेत, जी अत्यावश्यक नव्हती त्यांनाही नियम ठरवून उघडता येतील. जसे ७ ते २ पर्यंत दुकानं सुरु ठेवा, त्यानंतर बंद ठेवा, अशा स्वरुपात काही करता येईल. हे ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये करता येईल, पण रेड झोनबाबत केंद्र आणि राज्य शासन ठरवेल.

पुणे जिल्हा रेड झोनमध्ये आहे. पुणे शहरात कोरोना रुग्ण आहे. तालुक्यात कोरोना रुग्ण तुलनेने कमी आहेत. त्यामुळे तालुक्यातील इंडस्ट्री चालू झाली पाहिजे. तालुक्यातील व्यापार व्यवसाय उघडला पाहिजे. त्या ठिकाणची दुकान उघडली पाहिजे, अशी सरकरची भूमीका आहे.

महिनाभरात जवळपास 30 हजार जागा भरणार
राज्य सरकारने वैद्यकीय क्षेत्रातील सर्व रिक्त जागा महिनाभरात भरण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे कोणतीही परीक्षा न घेता, पूर्वीच्या शैक्षणिक पातळीवरील परीक्षांवरुन या जागा तातडीने भरल्या जातील असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभाग तसंच राज्यभरातील विविध महापालिका रुग्णालयांमध्ये जवळपास 30 हजार जागा रिक्त आहेत. या सर्व जागा महिना-दीड महिन्यात भरणार असल्याची माहित राजेश टोपे यांनी दिली.