लिंकरोड येथील मूळ झोपडीधारकास घरे मिळणार – अण्णा बनसोडे

0
304

पिंपरी दि. ३० (पीसीबी)- लिंक रोड, चिंचवड येथील पत्राशेड झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प गाळेवाटप रद्द करून मुळ झोपडपट्टीधारकास आठवड्यात घरे उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे आयुक्तांसोबतच्या बैठकीत ठरल्याची माहिती पिंपरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी दिली.

शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार बनसोडे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याशी शुक्रवारी (दि.29) साडेतीन तास मॅरेथॉन बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर या समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने ठरवले असल्याची माहिती आमदार बनसोडे यांनी या बैठकीनंतर दिली. आयुक्त पाटील ,अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे , जितेंद्र वाघ यांच्यासह सबंधित विभागाचे अधिकारी या बैठकीला हजर होते.

त्याविषयी बोलताना आमदार बनसोडे म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेशी सबंधित शहरातील विविध नागरी प्रश्नी पालिका प्रशासनाकडे गेले काही महिने पाठपुरावा सुरु होता. त्यासाठी आयुक्तांना निवेदनेही दिली होती. परंतू त्यावर समाधानकारक कार्यवाही न झाल्याने काल बैठक घेत शहरातील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला.

शहरवासीयांची अत्यंत निकडीची गरज असलेले कर्करोग रुग्णालय पालिकेने उभारण्याची व तृतीयपंथी व्यक्तींच्या दवाखान्याकरिता जागा देण्याची मागणी यावेळी केली. वायसीएम रुग्णालयात तृतीयपंथीयांकरिता सुरक्षारक्षकासह स्वतंत्र यंत्रणा उभी करण्याची सूचना केली. मिलींदनगर येथे बुद्धविहार तसेच सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याबाबत आणि दलित वस्ती सुधार योजनेतून नवीन कामे करण्याचा प्रस्ताव डीपीडीसीकडे पाठवण्याबाबत चर्चा झाली. ओपन जिम साहित्य खरेदीसाठी वार्षिक दरानुसार निविदा स्थगित करण्याबाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय झाला. लिंक रोड, चिंचवड येथील पत्राशेड झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प गाळेवाटप रद्द करून मुळ झोपडपट्टीधारकास आठवड्यात घरे उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे ठरले. भक्ती-शक्ती ते मुकाई चौक या उड्डाणपुल व रस्त्याचे काम लवकर मार्गी लावण्यास सांगण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.