राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात..

0
344

अहमदनगर, दि. ३०(पीसीबी): मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेसाठी जात असताना त्यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला आहे. अहमदनगरच्या पुढे घोडेगावजवळ हा अपघात झाला.राज ठाकरेंच्या ताफ्यातील तीन गाड्या एकमेकांना मागून धडकल्या. यात दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेता अंकुश चौधरी यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. उद्या (रविवारी) होणाऱ्या सभेसाठी राज ठाकरे हजारों कार्यकर्त्यांसह पुण्याहून औरंगाबादकडे रवाना होत असताना रस्त्यात हा अपघात झाला.

औरंगाबाद येथील सभा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी पुण्यातील सुमारे दीडशे ब्राह्मणांकडून त्यांना आशीर्वाद देण्यात आला.त्यासाठी चारही वेदांमधील मंत्रोच्चाराद्वाचे पठण झाले. “राज ठाकरे यांना यश मिळावे. त्यांची सभा निर्विघ्न पार पडावी. त्यांच्या विजयी वाटचालीस सुरुवात व्हावी. या हेतूने पुरोहित वर्गाच्या वतीने आम्ही मंत्रांद्वारे आशीर्वाद दिले,” असे गुरुजी मनोज पारगावकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

या मंत्राचे वेदपठण सुरु असताना राज ठाकरे यांनी महाआरती केली. सुमारे १५ मिनिटे वेदमंत्रांचे पठण सुरु होते. या महाआरतीनंतर मुख्य पुरोहितांनी राज ठाकरे यांच्या कपाळी कुंकुम तिलक लावत त्यांच्या औरंगाबाद येथील सभेसाठी शुभाशीर्वाद दिले.पुण्यात त्यांच्या गाडीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.

मशिदीवरील भोंगे उतरविण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेनंतर काही गुन्हे दाखल झाले तर मनसैनिकांना संरक्षण देण्यासाठी दोन हजार वकीलांची फौज तयार असल्याचे सुत्रांनी सांगितले. तीन मेला होणाऱ्या महाआरतीसाठी मनसेकडून वकील नेमण्यात आले आहेत.

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेबाबत बोलताना शिवसेना नेते राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “राज ठाकरे यांना सभा घेण्याचा छंद आहे, मात्र त्यांना यश मिळत नाही,अभ्यास करून परीक्षेत चांगले गुण पडले तर त्या अभ्यासला अर्थ आहे, अनेक सभा घेऊनही निवडणुकीत त्यांचे गुणपत्रक कोरेच असते, त्यांच्याकडे एकही पालिका नाही,त्यांचा केवळ एक आमदार आहे. त्यामुळे त्यांच्या सभेने काहीही फरक पडणार नाही. त्यांचे अकाउंट कोरेच आहे बिना पैशाचे अकाउंट दाखविण्यात काहीही अर्थ नाही,जनतेने त्यांना यश दिले पाहिजे,”