भीमसृष्टी प्रकल्पामध्ये मनुस्मृती दहन प्रसंगाचे शिल्प उभारा; मराठा सेवा संघाची मागणी

0
248

पिंपरी दि. ३० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने डॉ .बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारण्यात आलेल्या भीमसृष्टी प्रकल्पामध्ये मनुस्मृती दहन प्रसंग शिल्प उभारण्यात यावे, अशी मागणी मराठा सेवा संघाचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष अॅड. लक्ष्मण रानवडे यांनी केली.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात अॅड. रानवडे यांनी म्हटले आहे की, यापूर्वी तीन वेळा आम्ही मागणी केलेली होती हे चौथे स्मरण पत्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाच्या क्रांतिकारी घटनांच्या निर्णयामध्ये मनुस्मृती दहनाची घटना सामाजिक सांस्कृतिक परिवर्तनाचा फार मोठा अविष्कार समजला जातो. मनुस्मृती दहनाने बाबासाहेबांनी रूढी व परंपरेचे तोरण झुकारल्याची ती आत्मसाक्षात्कारी पहाट होती. या प्रसंगाचे इतिहासात अनन्य साधारण महत्व आहे.

पार्श्वभूमी पाहता महापालिकेने याबाबत साकल्याने विचार करून व या प्रसंगाचे इतिहासातील महत्व जाणकार तज्ञांकडून समजून घेत हा प्रसंग येणे समाविष्ट करावा. पिंपरी येथील भीमसृष्टी प्रकल्प शहराच्या व महापालिकेच्या अस्मितेचे केंद्र आहे. शहरातील सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी हा परिसर आज मोठी भूमिका बजावत आहे. महापालिकेकडून या प्रकल्पात मनुस्मृती दहन प्रसंग समाविष्ट करावयाचे राहून गेल्याचे दिसत असून सबब हा प्रसंग दाखल करावा अशी मागणी रानवडे यांनी निवेदनातून केली. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव, संघाचे मार्गदर्शक अशोक सातपुते, उपाध्यक्ष, प्रकाश बाबर, सुभाष देसाई , वाल्मिकी माने, अॅड. सुनील रानवडे उपस्थित होते.