लाॅकडाऊन काळात अंत्यविधी साहित्य मनपाने मोफत उपलब्ध करावे – नगरसेविका सिमा सावळे

0
1066

 

पिंपरी दि.४ (पीसीबी) – करोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी २१ दिवसांचे लॉकडाऊन सुरु असल्याने नागरिक कुटुंबासहीत घरातच आहेत.यामुळे हतावर पोट असणाऱ्या अनेक नागरिकांना उपजिविका भागविणे देखील अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत नैसर्गीक मृत्यु झालेल्या नातेवाईकांचे अंत्यविधी करण्यासाठी पैसे उपलब्ध करणे गोरगरीबांना शक्य होत नाही. मनपाच्या वतीने लाॅकडाऊन काळात अंत्यविधी साहित्य सर्व स्मशानभूमीत मोफत उपलब्ध करावे अशी मागणी जिजाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा, नगरसेविका सिमा सावळे यांनी आयुक्तांना केली आहे.

पिंपरी चिंचवड शहर हे कामगारांचे शहर असल्याने शहरात हातावर पोट असणऱ्यांची संख्या खुप मोठी आहे. लाॅकडाऊन असल्यामुळे नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. करोनाचे संकट अचानक विश्वासमोर अल्याने सर्व कामकाज ठप्प झाले आहे. गोरगरीबांसह अनेक मध्यम वर्गीय कुटुंबांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागत आहे. अशा परिस्थितीत कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा नैसर्गीक मृत्यु झाल्यास अंत्यविधीसाठी लागणारा खर्च करण्यासाठी घरात पैसेच नाहीत, अशी परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे. लाॅकडाऊन काळात अंत्यविधी साहित्य मनपाने मोफत उपलब्ध केल्यास नागरिकांना मदत होईल.कष्टकऱ्यांच्यासंकटाच्या या परिस्थितीत ज्यांना शक्य आहे त्यांनी यथा शक्ती मदत करावी असे आवाहन सिमा सावळे यांनी केले.