‘लालबागचा राजा’ मंडळाकडून पूरग्रस्तांना २५ लाख

0
460

मुंबई, दि. १४ (पीसीबी)-  कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी अवघ्या महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू आहे. अन्नधान्य व कपड्याबरोबरच पूरग्रस्त गावांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक योगदान दिले जात असून मुंबईतील गणेश मंडळांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. ‘लालबागचा राजा’ मंडळानं पूरग्रस्तांसाठी २५ लाखांची, तर ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ मंडळाने ५ लाखांची मदत दिली आहे.

मुख्यमंत्री निधीत ही रक्कम जमा केली जाणार आहे. तसेच, ‘लालबागचा राजा’चे मंडळ रायगडमधील जुई गावच्या धर्तीवर एक संपूर्ण गाव दत्तक घेऊन त्याचे पुनर्वसन करणार आहे. सरकारी यंत्रणांनी मदत घेऊन त्या बाबतची रूपरेषा ठरवण्यात येईल, अशी माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

मुंबईतील गणेश मंडळांनी सजावटीवरील अनावश्यक खर्च टाळून पूरग्रस्तांना मदत द्यावी, असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने काही दिवसांपूर्वीच केले होते. त्यानंतर अनेक मंडळांनी पूरग्रस्तांना मदत करण्याची ग्वाही दिली होती.