‘लानत है उनपर, जिनके पास दानत नहीं है’; पूरग्रस्तांकडे पाठ फिरवल्याने मनसेचा बॉलिवूडवर निशाणा

0
649

मुंबई, दि. १२ (पीसीबी) –  ‘लानत है उनपर, जिनके पास दानत नहीं है, अशा शब्दांत  महाराष्ट्र चित्रपटसेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी बॉलिवूड कलाकारांवर टीकेची झोड उठवली आहे. कोल्हापूर आणि सांगलीमधील पूरग्रस्तांना  सर्व स्तरातून मदतीचा हात दिला आहे.  मराठी कलाकारही  मदतीसाठी सरसावले आहेत,   परंतु  बॉलिवूड  कलाकार पुढे आलेले नाहीत, यावर मनसेने  टीका केली आहे.

मराठी कलाकारांनी राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी  मोहीम उघडली आहे.  सर्वांना  मदत करण्याचे  आवाहन केले आहे.  मात्र,  त्याचवेळी महाराष्ट्र ही कर्मभूमी  असताना  हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांनी पूरग्रस्तांकडे पाठ फिरवली आहे.  यावरूनच अमेय खोपकर यांनी आपल्या फेसबुकवरून निशाणा साधला आहे.

खोपकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी आहे, असे मुलाखतींमधून जे सांगतात ते बॉलिवूड कलाकार या संकटकाळात कुठे होते? ज्या प्रेक्षकांच्या जीवावर आपल्या तुंबड्या भरतात तेच प्रेक्षक जेव्हा दु:खात आहेत तेव्हा त्यांना सावरण्यासाठी पुढे का आले नाहीत? एकमेकांच्या टुकार सिनेमांचं प्रमोशन करण्यासाठी उठसूठ व्हिडीओ बाईट पोस्ट करणारे हिरो, यांना मदतीचं आवाहन करणारा एक साधा व्हिडीओही टाकता आला नाही?

लानत है उनपर, जिनके पास दानत नहीं है…