रितेश आणि जेनेलियाकडून पूरग्रस्तांना २५ लाखांची मदत

0
537

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – कोल्हापूर आणि सांगली शहरात पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली असून, मदतीचा ओघ सुरू झाला आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक मराठी कलाकार पुढे सरसावले असून प्रत्यक्ष सहभागी होत आहेत. मदत करणाऱ्यांच्या यादीत मराठमोळ्या रितेश देशमुखचाही सहभाग झाला आहे. रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलियाने पूरग्रस्तांना २५ लाखांची मदत केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी हा २५ लाखांचा चेक सोपवला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: आपल्या ट्विट अकाऊंटच्या माध्यमातून रितेश आणि जेनेलियाने केलेल्या मदतीची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करताना लिहिले आहे की, “रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाख रुपयांचे योगदान दिले. मी त्यांचा आभारी आहे!”.

दरम्यान एकीकडे मराठी कलाकार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेत असताना बॉलिवूड कलाकारांकडून मात्र पूर्ण निराशा झाली आहे. मदतीसाठी अद्याप एकही मोठा कलाकार पुढे आलेला नाही. मनसे चित्रपटसेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राला गरज असताना पूरग्रस्तांकडे पाठ फिरवणाऱ्या हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांवर टिकाही केली आहे.