स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगेंचा जेलमध्ये मुक्काम वाढला ,१५ जण एसीबीच्या रडारवर

0
309

पिंपरी, दि.२७ (पीसीबी) : लाचखोरीच्या गुन्ह्यात अटकेत असलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपचे स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांच्या जामिनावरील निर्णय न्यायालयाने आज (ता. २७) येत्या सोमवारपर्यंत राखून ठेवला. त्यामुळे लांडगेंसह स्थायी समितीच्या चार कर्मचाऱ्यांचा जेलमधील मुक्कामही सोमवारपर्यंत वाढला आहे. दरम्यान, या लाचखोरीच्या रॅकेटमध्ये स्थायी समितीचे सर्व म्हणजे १५ सदस्यांसह तेथील इतर कर्मचारीही सहभागी असल्याचे सांगत त्यांच्या चौकशीची गरज आहे, असे सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. त्यामुळे स्थायीचे इतर १५ सदस्यही आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) रडारवर आले असून त्यांचीही चौकशी होण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, स्थायी सदस्यांची चौकशी झाली, तर कुणाला किती टक्के मिळतात, या उघड गुपितावर कायद्यानेच शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे स्थायीतील सर्व १५ सदस्यांचे धाबे दणाणले आहेत. तर, स्थायीतील इतर कर्मचाऱ्यांचीही धडधड वाढली आहे. त्यांना साक्षीदार करून ही केस एसीबी मजबूत करण्याची शक्यता आहे. परिणामी आज वा सोमवारी पुन्हा एसीबीचे पथक पालिकेत धडकण्याची शक्यता आहे.

पुणे येथील विशेष न्यायालयात अॅड. लांडगेंसह या गुन्ह्यातील सर्व आरोपींच्या जामिनावरील युक्तिवाद आज पूर्ण झाला. सर्व पाच जणांच्या जामिनास सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील रमेश घोरपडे यांनी जोरदार विरोध केला. स्थायीतील सर्वांनी मिळून हा गुन्हा केला असल्याने त्या सर्वांची चौकशी करायची आहे. या गुन्ह्यात अटक झालेले स्थायी समितीचे सभापती अॅड. नितीन लांडगे यांचे पीए तथा स्थायीचे मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळेने टक्केवारी द्यावी लागत असलेले ते १६ जण म्हणजे स्थायी सदस्य असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे व स्थायीतील इतर कर्मचाऱ्यांचीही चौकशी करावी लागणार आहे. एकूणच तपास प्राथमिक टप्यावर असून तो पूर्ण झालेला नाही. त्यासाठी तपासाधिकाऱ्यांना पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे, त्यामुळे आरोपींना या टप्यावर जामीन दिला, तर फिर्यादीसह साक्षीदारांवर दबावही येईल. तसेच, या कटात सामील असलेले इतर संभाव्य आरोपी फरार होतील, असा युक्तिवाद अॅड. घोरपडे यांनी केला.

तपास पूर्ण झाला असून लाचेची रक्कमही जप्त करण्यात आली असल्याने आरोपींच्या कोठडीची अथवा त्यांना तुरुंगात ठेवण्याची गरज नाही, असे आरोपी लांडगे यांचे वकील अॅड. प्रताप परदेशी यांनी सांगत आरोपींना जामीन देण्याची विनंती केली. त्यासाठी न्यायालयाने टाकलेल्या अटी, शर्तींचेही पालन केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर विशेष न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी या प्रकरणाचा निकाल सोमवारपर्यंत राखून ठेवला आहे.