‘कोकणाला काही मिळालं की उद्धव ठाकरे यांच्या पोटात का दुखतं?’

0
229

मुंबई, दि.२७ (पीसीबी) :“ज्या लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाते त्यांच्या पवित्र भूमीतून सांगतो, महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक उध्दव ठाकरे हे आहेत”, अशा शब्दांत भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांनी रत्नागिरी येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून रत्नागिरीतून पुन्हा सुरुवात झाली असून रत्नागिरी जिल्हा कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आमदार आशिष शेलार यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली.

“स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी सिंहगर्जना लोकमान्य टिळकांनी केली. त्याच महाराष्ट्रात आज मुख्यमंत्री फक्त माझं, कुटुंब माझी जबाबदारी हाच माझा जन्मसिद्ध हक्क आहे, या धोरणाने काम करीत आहेत”, असंही ते म्हणाले आहेत.

“उद्धव ठाकरेंची शिवसेना कोकण विरोधी आहे. त्यावेळी कोकणचे सुपुत्र नारायण राणे मुख्यमंत्री झाले त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी षडयंत्र केले. तर सुरेश प्रभू यांना सुध्दा त्याकाळी अपमानास्पद वागणूक उद्धव ठाकरे यांनी दिली होती. बाकी रामदास कदम यांच्याही बाबतीत तेच झालं, अन्य नावे मी घेत नाही. तर आता नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीपद मिळाले त्यानंतर त्यांना अटक करण्यात आले. कोकणाला काही मिळालं की उद्धव ठाकरे यांच्या पोटात का दुखतं ? असा सवाल करत याचा संताप कोकणवासीयांना मध्ये आहे. येणाऱ्या काळात कोकणातील जनता हा संताप दाखवून देईल”, असा इशाराही त्यांनी दिला.

“महाराष्ट्रात असहिष्णुतेचे जनक उध्दव ठाकरे हेच आहेत. वडाळ्यातील एका व्यक्तीने सरकार विरोधी लिहिले म्हणून त्याचे सार्वजनिक ठिकाणी केशवपन करण्यात आले. एका निवृत्त नौदलाच्या अधिकाऱ्यांनी एक व्यंगचित्र फॉरवर्ड केले म्हणून त्यांचा डोळा फोडण्यात आला तर अभिनेत्री कंगना यांचे घर तोडण्यात आले. सरकार विरोधात बोलले म्हणून एका संपादकाला घरात घुसून अटक केलं गेलं. महाराष्ट्रात आज जे असहिष्णुतेचे हे वातावरण तयार झाले आहे त्याचे जनक उद्धव ठाकरे हे आहेत”, अशा शब्दांत शेलार यांनी टीका केली.