“लखीमपूर हिंसेला जबाबदार मंत्र्याची हकालपट्टी होत नाही आणि आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत….” : प्रियांका गांधींनी उचललं मोठं पाऊल

0
417

नवी दिल्ली, दि. ०७ (पीसीबी) : जोपर्यंत लखीमपूर हिंसेला जबाबदार असलेल्या मंत्र्याची हकालपट्टी होत नाही, जोपर्यंत त्या मुलाला अटक केली जात नाही, तोपर्यंत मी लढतच राहणार. मी तसूभरही मागे हटणार नाही. मी पीडितांच्या कुटुंबांना तसे वचनच दिलं आहे, असं काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी सांगितलं.

प्रियंका गांधी यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी थेट योगी सरकारला इशारा दिला आहे. मी लढणारच. जोपर्यंत या मंत्र्याची हकालपट्टी होत नाही, जोपर्यंत या मुलाला अटक केली जात नाही. तोपर्यंत मी हटणार नाही. कारण मी त्या कुटुंबाला वचन दिलं आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी झाली पाहिजे. नैतिकतेच्या आधारे मंत्र्याने राजीनामा दिलाच पाहिजे, असं प्रियंका गांधी म्हणाल्या.

लखीमपूर खिरी हिंसेतील पीडितांना नुकसानभरपाई देण्याची घोषणा सरकारने केली आहे. घोषणा केली म्हणजे सर्व काही संपत नाही. पीडित कुटुंबीयांना नुकसान भरपाई नव्हे तर न्याय हवा आहे, असं सांगतानाच जोपर्यंत राज्याचा गृहमंत्री राजीनामा देत नाही आणि आरोपींना शिक्षा होत नाही, तोपर्यंत पीडितांना न्याय मिळणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, प्रियंका गांधींचा गेस्ट हाऊसमध्ये झाडू मारतानाचा व्हिडीओ व्हायरल होत असताना, आता प्रशासनाकडून याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. प्रियंका गांधींना झाडू मिळाला कसा?, गेस्ट हाऊसमध्ये धूळ आलीच कशी? याबाबत चौकशी होणार आहे. लखीमपूर खीरीला जात असताना पोलिसांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियांका गांधींना ताब्यात घेतलं, आणि त्यानंतर त्यांना पीएसी गेस्ट हाऊसमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं. याचवेळी त्यांचा या गेस्टहाऊसमध्ये झाडू मारतानाचा व्हिडीओ समोर आला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनावर चांगलाच दबाव तयार झाला. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करुन याबाबत एक अहवालही तयार केला. त्यात असं समजलं की, प्रियंका गांधींच्या स्टाफ सदस्याने गेस्ट हाऊस कर्मचाऱ्याकडे झाडू मागितला. त्यानंतर त्यांना हा झाडू देण्यात आला. झाडू मिळाल्यानंतर प्रियंका गांधींनी स्वत: या गेस्टहाऊसमध्ये झाडू मारला, ज्याचा व्हिडीओ प्रियंका गांधींच्या स्टाफने शूट केला आणि नंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला.

प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सीतापूरच्या पीएसी गेस्ट हाऊसमध्ये ठेवलं होतं. या गेस्ट हाऊसमध्ये त्यांनी हातात झाडू घेऊन साफसफाई केली. झाडू मारतानाचा प्रियंका गांधी यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. 45 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत प्रियंका गांधी एकट्याच दिसत आहे. संपूर्ण रुम रिकामी आहे. त्या या रुममध्ये झाडू मारताना दिसत आहेत. प्रियंका यांना पीएसीच्या 22 व्या बटालियनच्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आलं होतं.