लंडनमध्ये कोरोना नियंत्रणाबाहेर, आपात्कालीन स्थितीची घोषणा

0
207

लंडन, दि. 8 (पीसीबी): ब्रिटनमध्ये कोरोनाचा कहर सुरु आहे. वृत्तसंस्था एपीच्या वृत्तानुसार, गेल्या 24 तासात 1,325 लोकांचा मृत्यू यूकेमध्ये झाला आहे. साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर ही मृतांची सर्वात मोठी संख्या आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार लंडनमध्ये आपत्कालीन संकटाची घोषणा करण्यात आली आहे. कोरोना संसर्गाची प्रकरणे आटोक्याच्या बाहेर गेली आहेत. धोका लक्षात घेता ब्रिटनने कोविड-१९ चाचणी भारतासह जगातील सर्व देशातील लोकांसाठी अनिवार्य केली आहे.

लंडनमधील नवीन कोरोना व्हायरसचा प्रसार अधिक झपाट्याने होत आहे. लंडनचे महापौर सादिक खान यांनी शुक्रवारी याची ‘मोठी घटना’ असे वर्णन केले. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार लंडनमध्ये राहणारा प्रत्येक 30 वा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे. लंडनमध्ये आता संक्रमित झालेल्यांची संख्या १,००,००० लोकांच्या तुलनेत एक हजाराहून अधिक आहे. 30 डिसेंबर ते 6 जानेवारी दरम्यान लंडनमध्ये रुग्णालयातील एकूण रुग्णांची संख्या 27 टक्क्यांनी वाढली आहे.
वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, आता कोरोना चाचणी अहवाल ब्रिटनला जाण्यापूर्वी 72 तासांपूर्वी दाखवावा लागेल. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवीन उपाययोजनांचा भाग म्हणून ब्रिटनने ही घोषणा केली.
प्रवाश्यांनी नवीन नियमांचे पालन केले नाही किंवा कोरोना चाचणी केली नाही तर त्याच्याकडून 500 पाऊंड पर्यंत दंड आकारला जाईल. कोरोनाची चाचणी केली नसेल तर प्रवाशांना ब्रिटनमध्ये येण्याची परवानगी दिली जाणार नाही. ब्रिटीश परिवहन मंत्री ग्रँट शॅप्स म्हणाले की कोरोनाला रोखण्यासाठी आम्ही यापूर्वी बरीच पावले उचलली आहेत, परंतु विषाणूचा नवा प्रकार आल्याने आता अतिरिक्त खबरदारी घ्यावी लागेल.