रुपाली चाकणकरांनी पाठवल्या पोस्टाद्वारे मोदींना शेणाच्या गोवऱ्या ..

0
213

पुणे , दि. ४ (पीसीबी) :राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वात आज संपूर्ण राज्यात महागाई विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी महागाईचा निषेध म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेणाच्या गोवऱ्या गिफ्ट म्हणून पाठवल्या आहेत.

रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वातील सिटी पोस्टाबाहेर हे आंदोलन सुरू आहे. यावेळी पोस्टाद्वारे मोदींना शेणाच्या गोवऱ्या पाठवण्यात आल्या आहेत. मोदीसरकारने गॅस सिलेंडरचे भाव 25 रुपयांनी वाढवत देशातील सर्व भगिनींना रक्षाबंधनाची ओवाळणी दिली होती. याच प्रेमाखातर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने पंतप्रधानांना रक्षाबंधनाचं आणि महागाईचं रिटर्न गिफ्ट म्हणून शेणाच्या गोवऱ्या पाठवल्या आहेत. या आंदोलनाची सुरुवात पुणे येथे प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. अच्छे दिनाची खोटी स्वप्नं दाखवून जनतेच्या डोळ्यात अश्रू आणणाऱ्या या भावाला महागाईचे प्रतिक म्हणून शेणाच्या गोवऱ्या महिलांनी राज्यभरातून भेट म्हणून पाठवल्या आहेत, असं चाकणकर यांनी सांगितलं.
महिलांच्या आरोग्याचा विचार करून मोठ्या मनाने आपल्या पंतप्रधानांनी उज्वला गॅस योजना आणली. परंतु फक्त योजना आणून पोट भरत नसतं. दर 15 दिवसांनी स्वयंपाकाचा गॅस सिलेंडरचा दर वाढतोय. त्यामुळे ज्या उद्देशाने ही योजना सुरू झाली, त्याचा मूळ हेतूच नष्ट झाला आहे. आता महिलांना पुन्हा ‘चुलीकडे चला’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे, असा संताप चाकणकर यांनी केला आहे.
सात वर्षांत गॅस सिलेंडरची दरवाढ दुप्पटीने वाढली आहे. कोरोनाच्या महामारीत सर्वसामान्य माणूस आर्थिक, शारीरिक व मानसिकदृष्ट्या खचलेला आहे. त्याला आधार देण्याऐवजी दर पंधरा दिवसांनी गॅस, पेट्रोल – डिझेल दरवाढ करून केंद्रसरकार सर्वसामान्य माणसाच्या जखमेवर मीठ चोळत आहे, असे त्या म्हणाल्या. सन्माननीय पंतप्रधान मोदीसाहेब, आज देशभरातील महिला भगिनी आपल्याला विचारतात, “क्या हुआ आपका वादा, महंगाईसे घर बेचना पडा आधा,” असा टोलाही त्यांनी लगावला आहे.