कोरोनापाठोपाठ डेंग्यू, मलेरियाचा ‘ताप’; रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या वाढली..

0
217

मुंबई , दि. ४ (पीसीबी) : कोरोनाचं संकट कमी होतं ना होतं तोच आता मुंबईत डेंग्यू आणि मलेरियाची साथ आली आहे. मुंबईत ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण आढळले असून त्यामुळे पालिकेतील रुग्णालये रुग्णांनी भरून गेली आहेत. मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्यानंतर आता साथीच्या आजारांचा धोका वाढत आहे. बदलते वातावरण आणि पाऊस या संसर्गासाठी पोषक ठरत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी योग्य खबरदारी घेऊन वेळीच वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. ऑगस्ट महिन्यात मुंबई शहर आणि उपनगरांत मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण वाढल्याचे दिसून आले आहे.

केवळ ऑगस्ट महिन्यात 790 मलेरियाचे रूग्ण आढळून आले आहेत. तर, डेंग्यूचे 132 रुग्ण सापडले असून आतापर्यंत एकूण 209 रुग्णांची नोंद झाली आहे.जानेवारी ते ऑगस्टपर्यंत मलेरियाच्या 3338 रुग्णांची नोंद झाली आहे. तर आठ महिन्यांत 1848 गॅस्ट्रो रुग्णांची नोंद झाली आहे. जानेवारी महिन्यापासून मुंबईत मलेरियाचे 3338 रूग्ण, लेप्टोस्पायरोसिसचे 133 रूग्ण, डेंग्यूचे 209, गॅस्ट्रो आजाराचे 1848, तर काविळीचे 165 तसेच स्वाइन फ्लू आजाराचे 45 रूग्ण गेल्या आठ महिन्यांत आढळले असल्याचे सांगण्यात आले.
डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण डोंगरी(बी विभाग), परळ (एफ साऊथ) आणि वांद्रे पश्चिम (एच पश्चिम) या भागांत आढळले आहेत. कीटकनाशक विभागाने 13 लाख 15 हजार 373 घरांची पाहणी केली आहे. तसेच यातील 11 हजार 492 डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यात आली आहेत.
जर लोकांचा ताप 2-3 दिवसात कमी होत नसेल तसेच थंडी, पुरळ येणे, डोकेदुखीशी होत असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यांनी अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे .हे लक्षणे मलेरिया, डेंग्यूची देखील असू शकतात. लहान मुले आणि वृद्धांकडे त्वरित लक्ष दिले पाहिजे. पावसाळ्यात ताप उलट्या आणि जुलाब आणि डोळे पिवळसर होणे, कावीळ सारखी लक्षणे दिसताच पोटविकार तज्ञांचा सल्ला घ्या. सम लक्षणांमुळे कोविड रुग्ण ओळखून त्यादृष्टीने अचूक उपचार करणे आव्हनात्मक ठरत आहे. डेंग्यू आणि मलेरियाला दूर ठेवण्यासाठी, डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे शोधून ती काढून टाकली पाहिजेत. पाणी वाहून जाण्यासाठी योग्य व्यवस्था आहे याची खात्री करून घ्या. डास चावणे टाळण्यासाठी पूर्ण बाहीचे कपडे घाला आणि डास प्रतिबंधक आणि जाळी वापरा आणि वेळोवेळी फवारणी करण्याची गरज आहे.