राहुल-पवारांच्या चर्चेनंतर आघाडीचा तिढा सुटला

0
1210

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसच्या ४८पैकी ४० जागांवर एकमत झाल्यानंतर उर्वरित आठ जागांच्या वाटपाचे गाडे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नवी दिल्लीत बुधवारी झालेल्या बैठकीमुळे पुढे सरकले आहे. मित्रपक्षांना कोणत्या जागा द्यायच्या आणि दोन्ही काँग्रेसने कोणत्या मतदारसंघात उमेदवारांची अदलाबदल करायची याचा तिढा जवळपास सुटला असून, नजीकच्या काळात त्याबाबतचा निर्णय जाहीर करण्याचे उभय पक्षांच्या श्रेष्ठांनी ठरविले आहे, अशी माहिती आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्रातील एका नेत्याने दिली आहे. 

विदर्भातील यवतमाळ आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्या ताब्यातच राहील. खान्देशातील धुळे आणि नंदुरबार या दोन्ही जागा काँग्रेसच्या ताब्यात ठेवण्यास राष्ट्रवादी राजी झाली आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद मतदारसंघ राष्ट्रवादीला हवा आहे. मात्र, उत्तर महाराष्ट्रात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्यास अजिबात तयार नाही. याठिकाणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील इच्छुक आहेत. शिर्डीचा राखीव लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्यास काँग्रेस राजी आहे. काँग्रेसच्या कोट्यातील रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा राष्ट्रवादीला हवी आहे. तथापि, लोकसभा निवडणूक आणखी दीड महिन्यांवर असल्यामुळे जागावाटपाची घाई न करण्याची दोन्ही काँग्रेसची नीती आहे.

महाराष्ट्रातील ४० जागांवर यापूर्वीच स्थानिक नेत्यांमध्ये एकमत झाले असून, काँग्रेस २१ आणि राष्ट्रवादी १९ असे हे सूत्र आहे. उर्वरित आठ जागांमध्ये दोन्ही काँग्रेसचे पूर्वीचे मतदारसंघ बदलण्याची शक्यता असून, प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाला अकोला अथवा अमरावतीपैकी एक, राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हातकणंगले, हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला पालघर राखीव आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीचा राखीव मतदारसंघ देण्याबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. तथापि, अन्य समविचारी पक्षांनीही आपल्या राजकीय ताकदीचा अंदाज घेऊनच रास्त जागा मागितल्या पाहिजे, असा सूर यावेळी निघाला.