राहुल गांधींचे नाव पंतप्रधानपदासाठी काँग्रेस घोषित करणार नाही – पी. चिदंबरम

0
535

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – आगामी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी घोषित करणार नाही. तसेच राहुल गांधी यांचेच नाही, तर इतर कोणाचेही नाव काँग्रेस पंतप्रधान पदासाठी पुढे करणार नाही, असे काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी स्पष्ट केले आहे.

चिदंबरम म्हणाले की, राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवणार आहोत, अशा प्रकारची मत काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली होती, त्यानंतर काँग्रेसने याची दखल घेत अशी विधाने न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आम्हाला भाजपला सत्तेतून दूर करायचे आहे. त्यासाठी सरकार पुरोगामी असावे, त्यात व्यक्तिगत स्वातंत्र्याचा सन्मान होईल, टॅक्स टेररिझमला प्रोत्साहन दिले जाणार नाही, महिला आणि मुलांना संरक्षण दिले जाईल तर शेतकऱ्यांच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध राहिल, असे ते म्हणाले.

आम्हाला एक अशी आघाडी तयार करायची आहे, ज्यामध्ये पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचा निर्णय निवडणुकीनंतर सर्व पक्ष एकत्र बसून घेतील. गेल्या दोन दशकांमध्ये राष्ट्रीय पक्षांच्या वोट बँकांमध्ये लुटमार करीत प्रादेशिक पक्ष मजबूत झाले आहेत. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा संयुक्त मतांची भागीदारी ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. प्रादेशिक पक्षांनी काँग्रेससोबत जाऊ नये, यासाठी भाजप भीतीचे वातावरण निर्मितीचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही चिदंबरम यांनी केला आहे.