#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन

0
814

पुणे, दि. २२ (पीसीबी) – लैंगिक शोषणाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या ‘मी टू’च्या चळवळीने देशभरात मोठी चर्चा सुरू असताना पुण्यातील नावाजलेल्या सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशनमधील (एससीएमसी) काही आजी माजी विद्यार्थ्यांनी #MeToo प्रकरणी संस्थेतील काही प्राध्यापकांवर आरोप केले होते. त्यानंतर आता या प्रकरणी दोन प्राध्यापकांचे निलंबन करण्यात आले आहे, तर एका संचालकाला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

काही दिवसापुर्वीच विद्यार्थ्यांकडून आरोप करण्यात आले होते. त्यानंतर संस्थेकडून समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीची चौकशी पूर्ण होईपर्यंत दोन प्राध्यापकाना निलंबित आणि एका संचालकाला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याची माहिती सिंबायोसिसच्या संचालिका विद्या येरवडेकर यांनी दिली.

सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशन विमाननगर येथे आहे. या महाविद्यालयांतील १० पेक्षा अधिक विद्यार्थिनींनी, विशेषत माजी विद्यार्थिनींनी ६ ऑक्टोबरपासून समाजमाध्यमांद्वारे त्यांच्या बाबतीत घडलेल्या लैंगिक शोषणाच्या प्रकारांविषयी व्यक्त होण्यास सुरुवात केली. त्यात त्यांनी काही विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या नावांचाही उल्लेख केला. तसेच विमाननगर कॅम्पसमध्ये विशेष ‘संस्कृती’ असल्याचेही लिहिले होते. एका माजी विद्यार्थिनीने तिच्या इंटर्नशिपदरम्यान झालेल्या लैंगिक शोषणाविरोधात महाविद्यालयातील इंटर्नशिप समन्वयकाकडे तक्रार केली असता, तिची इंटर्नशिप थांबवण्यात आल्याचे नमूद केले होते. तसेच लैंगिक शोषणाबाबत प्रशासनाचे लक्ष वेधूनही काहीच कारवाई झाली नसल्याचा आरोपही विद्यार्थिनींनी आपल्या पोस्टमधून केला होता.