राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी कोल्हापूर आणि नगरच्या लेकी करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व

0
638

पुणे,दि.१७(पीसीबी) – यापूर्वीच कुमार गटातून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवणाऱ्या कोल्हापूरच्या स्वाती शिंदे आणि नगरच्या भाग्यश्री फंड यांच्यावर महिलांच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या आशा अवलंबून असतील. महाराष्ट्र संघाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वाती वगळता इतर सर्व खेळाडू या प्रथमच वरिष्ठ पातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात झालेल्या निवड चाचणी स्पर्धेत या मुलींनी आपले कौशल्य पणाला लावले. स्वाती आणि भाग्यश्री या दोघी कुमार गटात आशिया पातळीरील पदक विजेत्या आहेत. या दोघींबरोबर दिशा कारंडे, प्रतिक्षा बागडी या कुमार गटात उज्ज्वल यश मिळविणाऱ्या कुस्तीगीर देखिल राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतील. महिलांची वरिष्ठ गटाची २३वी राष्ट्रीय स्पर्धा या महिना अखेरीस ३० आणि ३१ जानेवारीस उत्तर प्रदेशा आग्रा येथे होणार आहे. एकूण दहा वजनी गटात होणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्र संघात कोल्हापूरचे वर्चस्व राहिले असून, सात कुस्तीगिर कोल्हापूरच्या आहेत.

पुरुषांच्या निवड चाचणीप्रमाणे या वेळी देखिल कोरोनाबाबत आखून देण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यात आले होते.

संघ –
स्वाती शिंदे (५० किलो), नंदिनी साळोखे (५३ किलो), दिशा कारंडे (५५ किलो), विश्रांती पाटिल (५७ किलो), अंकिता शिंदे (५९ किलो), भाग्यश्री फंड (६२ किलो), सृष्टि भोसले (६५ किलो), ऋतुजा संकपाळ (६८ किलो), प्रतिक्षा बागडी (७२ किलो), पौर्णिमा सातपुते (७६ किलो)