राष्ट्रवादीला सर्वांत मोठा धक्का; खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर?

0
558

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरु झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उदयनराजेंनी भाजपमध्ये यावे यासाठी मुख्यमंत्री आग्रही आहेत. त्यातच आगामी विधानसभा निवडणुकीबरोबरच खासदारकीची पोटनिवडणूक शक्य असेल तर राजीनामा देण्याची तयारीही उदयनराजेंनी दाखवली असल्याची माहिती समोर येत आहे. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीत असणारा कलह गेल्या काही दिवसात सर्वांच्या समोर आला होता. उदयनराजेंचे चुलत भाऊ शिवेंद्रसिंह भोसले हे साताऱ्याचे आमदार असून दोघांमधून विस्तव जात नाही. आणि यातूनच शिवेंद्रराजे यांनी भाजपात दाखल झाले होते.

त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकरही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली होती. आता उदयनराजेही भाजपाच्या वाटेवर असल्याचे समोर येत आहे. उदयनराजे जर भाजपात गेले तर शिवेंद्रराजेंची नाराजी आणखी वाढण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीला मोठी गळती लागली आहे. अनेक जण भाजप आणि शिवसेनेत जाण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र ही गळती रोखण्यासाठी उदयनराजे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची हवा निर्माण करण्याची खेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने खेळल्याचे बोलले जात आहे.