राष्ट्रवादीच्या भोसरीतील सभेत विलास लांडे यांच्या जयघोषाने कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ

0
1058

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – अभिनेते व शिवसेनेचे नेते डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने दुखावलेल्या विलास लांडे यांच्या कार्यकर्त्यांनी भोसरीत मंगळवारी (दि. ५) झालेल्या सभेवेळी प्रचंड गोंधळ घातला. कार्यकर्त्यांनी सातत्याने विलास लांडे यांच्या नावाने घोषणा देत प्रत्येक वक्त्याच्या भाषणात अडथळा आणला. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात लांडे यांना उमेदवारी न मिळाल्यास त्यांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची भूमिका काय असणार, याचे चित्र सभेवेळी पाहायला मिळाले.

अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यांना शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी देण्याचा पक्षश्रेष्ठींचा विचार आहे. परंतु, त्यांनी अद्याप त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. डॉ. कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वीच भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी मीच राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून तयारी सुरू केली होती. त्यासाठी त्यांनी संपूर्ण मतदारसंघात मोठ्या प्रमाणात फ्लेक्सबाजी केली होती. मात्र डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने लांडे यांनी केलेल्या तयारीवर पाणी फेरले गेले आहे

या पार्श्वभूमीवर भोसरी येथील गावजत्रा मैदानावर मंगळवारी राष्ट्रवादीची जाहीर सभा झाली. या सभेला अजितदादा पवार, दिलीप वळसे पाटील, डॉ. अमोल कोल्हे, विलास लांडे यांच्यासह शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. सायंकाळी सहा वाजता आयोजित केलेल्या या सभेला रात्री साडेसात वाजता सुरूवात झाली. व्यासपीठावर सर्व नेते उपस्थित असताना विलास लांडे यांच्या कार्यकर्त्यांनी सभेवेळी घोषणाबाजीने प्रचंड गोंधळ घातला. विलास लांडे यांच्या विजयाच्या घोषणाबाजीने सभेचे ठिकाण दुमदुमून सोडले. त्यामुळे सभेत प्रत्येक वक्त्याच्या भाषणावेळी अडथळा निर्माण झाला. अखेर विलास लांडे हे भाषणाला उभे राहिल्यानंतर त्यांनी दरडावल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी थांबवली. मात्र कार्यकर्त्यांच्या या घोषणाबाजीने विलास लांडे गटात अस्वस्थता असल्याचे दिसून आले.