राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंचे पुतणे अवधूत तटकरे शिवसेनेच्या वाटेवर

0
565

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसची गळती कायम आहे. राष्ट्रवादीचे अनेक नेते पक्षांतर करत असल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार यांची चिंता वाढली आहे. आता रायगडचे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आमदार अवधूत तटकरे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. यामुळे राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता आहे.

अवधूत तटकरे आज (गुरूवारी) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. याआधीही अवधूत यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उध्दव ठाकरे यांची  भेट घेतली होती. आगामी विधानसभा  निवडणुकीच्या  तोंडावर तटकरे कुटुंबीयांसाठी हा मोठा राजकीय धक्का असणार आहे.

दरम्यान, अवधूत तटकरे आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये मतभेद असल्याचे सांगितले जात आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी या दोघांमध्ये समेट घडविण्याचा प्रयत्न केला होता. पण  त्यांना  यश आले नाही. अवधूत तटकरेंच्या छोट्या भावाने याआधीच  शिवसेनेत प्रवेश केला  आहे.