सात ते आठ आमदारांसह छगन भुजबळ शिवसेनेत करणार प्रवेश?

0
468

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील बदलती राजकीय हवा लक्षात घेऊन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा रंगली होती. मागच्या आठवड्यात त्यांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहुर्त ठरल्याची चर्चा देखील सुरु होती. मात्र, शिवसेनेतील काही आमदारांनी केलेल्या पुरजोर विरोधामुळे त्यांचा पक्षप्रवेश रखडला. मात्र असे झाले तरीही भुजबळांचे प्रयत्न थांबलेले नाहीत, अशी माहिती पुढे आली आहे. मातोश्रीकडून एकट्याला दुर्लक्षीत करण्यात आल्याने आता राज्यातील सात ते आठ आमदारांसह भुजबळ शिवसेनेत जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती एका राजकीय नेत्याने दिली आहे. जर असे झाले तर राज्यात पुढच्या आठवड्यात विरोधकांना नवा राजकीय धक्का बसण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे ह्या काल नाशिकच्या दौऱ्यावर होत्या. त्यांच्या दोन दिवसीय या दौऱ्यात स्वागत, विविध कार्यक्रमांत माजी खासदार समीर भुजबळ व त्यांच्या पत्नी शेफाली भुजबळ यांचा सहभाग होता. मात्र छगन भुजबळ या दौऱ्यात सहभागी नव्हते. त्यामुळे छगन भुजबळ यांचा २४ ऑगस्टचा शिवसेना प्रवेशाचा मुहुर्त टळल्यावर शिवसेना प्रवेशाच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे.

शिवसेनेत अंतर्गत विरोधामुळे त्यांच्या एकट्याचा प्रवेश रखडला. त्यामुळे आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांच्या सात ते आठ आमदारांसह प्रवेशाची तयारी सुरु झाली आहे. त्याच्या जोरदार हालचाली सुरु आहेत. यातील काही आमदार यापूर्वीच शिवसेनेत जाण्याच्या तयारीत होते. मात्र, एकट्याने गेल्यावर त्या पक्षात आपली दखल, राजकीय निभाव लागणार नाही अशी चिंता कॉंग्रेस संस्कृतीत वाढलेल्या या आमदारांना आहे. त्यांच्यातील या असुरक्षिततेचा विचार करुन एक फुल नको तर थेट सात-आठ फुलांचा गुच्छच द्यावा अशी तयारी आहे, अशी माहिती एका ज्येष्ठ नेत्याने दिली.