ज्या दिलीप सोपल यांना बाळासाहेबांनी माकड म्हटले होते, ते आज शिवसेनेत कसे?

0
608

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – विधानसभा निवडणूकीचा फड आता चांगलाच रंगतदार होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधली गळती अजूनही सुरूच आहे. कॉंग्रेस अद्याप कुंभकर्णाच्या निद्रावस्थेतच आहे. महायुतीचे लोकं जागृत होऊन उघड्या डोळ्यांनी राजकारणाची गणिते मांडत आहेत तर राष्ट्रवादीतले कार्यकर्ते जाणा-या नेत्यांची पोल खोलण्यात व्यस्त दिसत आहेत.

राष्ट्रवादीचे मावळे, पावारांचा उजवा हात मानला जाणारे आमदार दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीला रामराम करून शिवसेनेत दाखल झाले आहे. मोठ्या दिमाखात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातावर शिवबंधन बांधून घेतले आहे. त्या दिलीप सोपल यांचा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी सोपल यांचा चक्क माकड म्हणून उल्लेख केला आहे. या व्हिडिओमध्ये बाळासाहेब ठाकरे म्हणतात, “सोपल या माकडाला तुम्ही एवढी किंमत देता? तुम्ही मर्द बसलात तर कोण सोपल, आडवा झालाय तिकडे हॉस्पिटलमध्ये. अन्नाची शपथ घेऊन नमक हरामी केलीय त्याने. तुम्ही सगळे फाडणारे मर्द इकडे असताना मी कशाला त्याच्याशी बोलयचे?. धूळ चारा आता त्याला बार्शीची धूळ. त्याला सांगा तू जरी बेईमान असला तरी बार्शीची धूळ इमानदार आहे. इथे गद्दाराना गाडून टाकू आम्ही.” ज्या सोपल यांना बाळासाहेबांनी माकड म्हणून हिनवले, गद्दाराची उपमा दिली ते सोपल आता शिवसेनेत आले आहेत. त्यांना पक्षप्रवेश दिलाच कसा असे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.