राम मंदिराची आम्ही भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

0
521

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – राम मंदिराची आम्ही भीक मागत नाही. सरकारने कायदा करुन राम मंदिर उभा करावे, अशी मागणी  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक सुरेश भैयाजी जोशी यांनी मोदी सरकारकडे  केली आहे. अयोध्येत राम मंदिर उभारणीची मागणी घेऊन विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) हजारो कार्यकर्ते रामलीला मैदानावर जमा झाले आहेत. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आमचा कोणाबरोबरही वाद नाही. जर वाद किंवा संघर्ष करायचाच असता तर इतका वेळ वाट पाहिली नसती. याला धर्माच्या दृष्टीने पाहू नये. मंदिराच्या निर्मितीचे भविष्य रामराज्याचा पाया बनेल, असे म्हणत देशावर हल्ला करणाऱ्यांचे अस्तित्व संपुष्टात येईल, असेही जोशी म्हणाले.

राम मंदिरचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. यावर भैयाजी जोशी  बोलताना म्हणाले की,   न्यायालयाने आपली प्रतिष्ठा राखली पाहिजे. सत्तेत बसलेल्या लोकांनी मंदिर तिथेच उभारणार असल्याची घोषणा केली होती. आता संकल्प पूर्ण करण्याची वेळ आली आहे. आता हे आश्वासन पूर्ण केले पाहिजे. सत्तेत बसलेल्या लोकांनी लोकभावनांचा सन्मान केला पाहिजे. आम्ही भीक मागत नाही, असा सवाल त्यांनी केला.