राम कदमांवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांनी धाडस दाखवावे – उध्दव ठाकरे

0
506

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – मुलींविषयी वादग्रस्त विधान करणारे भाजपचे आमदार राम कदम यांना कोणत्याही पक्षाने उमेदवारी देऊ नये. त्याचबरोबर माता-बहिणींचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धाडस दाखवून राम कदम यांच्यावर कारवाई करावी, असेही आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

मुंबईत उद्धव ठाकरे यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजप आमदार राम कदम यांच्या वादग्रस्त विधानाचा खरपूस समाचार घेतला.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजप आमदाराने तारे तोडले आहेत. प्रशांत परिचारिक, श्रीपाद छिंदम असेल किंवा राम कदम असतील, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. इतकेच  नाही, तर यांना कोणत्याही पक्षाने उमेदवारी देऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच भाजपने ‘बेटी भगाओ’ अभियान सुरु केले आहे का? असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी राम कदम यांच्यावर धाडसाने कारवाई करावी, असे आवाहनही उद्धव ठाकरेंनी केले.

मुलीने विरोध केला तरीही तिला पळवून आणून तुम्हाला देणार’ असे विधान भाजप आमदार राम कदम यांनी घाटकोपर येथील दहीहंडी कार्यक्रमात केले होते. कदम यांच्या या विधानाचा व्हिडोओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठवण्यात येत आहे.