राफेल प्रकरणात शरद पवारांनी मोदींना क्लीनचीट दिलेली नाही – सुप्रिया सुळे  

0
501

मुंबई, दि. २९ (पीसीबी)  – राफेल  विमानांच्या खरेदी व्यवहारात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना  कोणतीही  क्लीनचीट दिलेली नाही.  प्रसारमाध्यमांनी शरद पवारांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला  आहे, असा  खुलासा राष्ट्रवादी  काँग्रेसच्या खासदार  सुप्रिया सुळे यांनी केला आहे.  पवारांनी क्लीनचीट दिली असे सांगणाऱ्यांनी  ती मुलाखत नीट पाहिलेली नाही.  किंवा ते जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत आहेत,  असेही सुळे म्हणाल्या.

राफेल विमानांच्या किंमती का वाढल्या ? याचा  सरकारने  खुलासा  करावा. राफेल व्यवहाराची संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशी  करण्यात  यावी.  तसेच भाजपच्या दुटप्पीपणावर  पवारांनी टीका केली होती. भाजपने बोफोर्सच्यावेळी जेपीसीची मागणी केली आणि आता राफेलच्यावेळी ते सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहेत,  असे पवार यांनी म्हटले होते.  मात्र,  त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे,  असे  सुळे म्हणाल्या.

दरम्यान,  राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व  खासदार  तारिक अन्वर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. याबद्दल बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तारिक अन्वर यांनी पक्ष सोडल्याने वाईट वाटत आहे. ते २० वर्षांपासून पक्षासोबत आहेत. त्यांनी शरद पवारांना एकदा फोन करुन चर्चा करायला हवी होती, असे त्या म्हणाल्या.