राफेल कराराबाबत काँग्रेसकडे चुकीची माहिती; अनिल अंबानींचे राहुल गांधींना पत्र  

0
891

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – काँग्रेसने राफेल करारावरुन केंद्र सरकारवर  आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.  या पार्श्वभूमीवर उद्योगपती अनिल अंबानी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र  लिहीले आहे.  ‘काही स्वार्थी वृत्ती आणि व्यावसायिक स्पर्धकांनी काँग्रेसला चुकीची माहिती देत दिशाभूल करत आहेत’, असे अंबानींनी या पत्रात म्हटले आहे.

राफेल युद्ध विमान खरेदीत ४१ हजार कोटींचा घोटाळा झाला असून  पंतप्रधान मोदी यावरून मुग गिळून गप्प आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे. राफेलची निर्मिती करणाऱ्या फ्रान्सच्या दासॉल्ट कंपनीने स्थानिक भागीदार म्हणून रिलायन्स डिफेन्सची निवड केली  आहे. १४ दिवसआधी स्थापन झालेल्या कंपनीला साहित्य निर्मितीचे कंत्राट देण्यात आले. केवळ आपल्या मित्रांचा फायदा होण्यासाठी   देशाच्या सुरक्षेशी खेळण्याचा हा प्रकार आहे, असे काँग्रेसने म्हटले होते.

काँग्रेसच्या आरोपानंतर रिलायन्स धिरुभाई अंबानी समुहाचे अनिल अंबानी यांनी राहुल गांधी यांना पत्र पाठवले आहे. अनिल अंबानी म्हणतात, सर्व आरोप हे निराधार आणि चुकीच्या माहितीवर आधारित आहे. हा दुर्दैवी प्रकार आहे. राफेल विमानांची निर्मिती रिलायन्स द्वारे होत नसून सर्व ३६ विमाने फ्रान्समध्येच तयार करून भारतात आणली जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

आमची भूमिका फक्त निर्यातीमध्येच आहे, असे त्यांनी नमूद केले. संरक्षण मंत्रालयाकडून रिलायन्स डिफेन्स किंवा रिलायन्स समूहातील कोणत्याही कंपनीला कंत्राट दिलेले नाही, असा खुलासाही त्यांनी केला.