राफेल कराराची फाईल चार दिवसांसाठी द्या, त्यांना जन्मभरासाठी तुरुंगात पाठवतो – अरविंद केजरीवाल

0
1006

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – आमच्या सरकारच्या ४०० फाईल केंद्र सरकारकडून नेमण्यात आलेल्या समितीने तपासल्या आहेत. त्या बदल्यात माझ्याकडे राफेल कराराची फाईल  केवळ चार दिवसांसाठी द्यावी, मी त्यांना जन्मभरासाठी तुरुगांत पाठवेन, असे आव्हान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला दिले आहे.

आमच्या ४०० फाईल तपासल्या, मला केवळ ४ फाईल द्याव्यात. त्यापैकी एक राफेल कराराची फाईल केवळ चार दिवसांसाठी द्या. मी त्यांना जन्मभरासाठी तुरूंगात टाकेन, असे   केजरीवाल यांनी म्हटले आहे. ‘आप का दान, राष्ट्र का निर्माण’ या ‘आप’च्या डोनेशन कॅम्पेनच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावरही कथित भ्रष्टाचारावरून निशाणा साधला. तसेच दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार हे गेल्या ७० वर्षांतील सर्वात प्रामाणिक सरकार असल्याचा दावाही त्यांनी केला. प्रामाणिक सरकारच्या अभिमानामुळे आता दिल्लीच्या नागरिकांची छाती ५६ इंच नाही. तर ६० इंचाने फुलली आहे, असा टोलाही केजरीवाल यांनी  मोदींना लगावला.