राज ठाकरे बोले, भाजप सरकार हाले; डिजीटल गाव हरिसालकडे लक्ष देणार

0
774

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रत्येक सभेत भाजपविरोधात आक्रमक प्रचार करत असून भाजपला त्यांच्या प्रत्येक आरोपाचे खंडन करणे भाग पडत आहे. सोलापूरच्या सभेत डिजीटल व्हिलेज ‘हरिसाल’ ची राज ठाकरेंनी ‘पोल खोल’ केल्यानंतर याप्रकरणी लक्ष देऊ अशी सारवासारव शिक्षण मंत्री विनोद तावडेंना करावी लागली आहे.

अमरावती जिल्ह्यातील हरिसालचा देशातील पहिले डिजीटल गाव म्हणून भाजपने विकास केला होता. या गावाच्या विकासाबद्दल भरपूर प्रचार आणि प्रसारही मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आला होता. गुढीपाडवा सभेमध्ये राज ठाकरेंनी हरिसालच्या संदर्भात भाजपने केलेले सर्व दावे खोटे असल्याचा आरोप केला होता. तर राज ठाकरेंच्या आरोपात काहीच तथ्य नाही असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

पण सोलापूरच्या सभेत हरिसाल संदर्भातील आपल्या आरोपाची पाठराखण करणारे पुरावेच राज ठाकरेंनी दिले. डिजीटल गाव हरिसालचा प्रचार करण्यासाठी जी जाहिरात बनवण्यात आली होती त्या जाहिरातीत दिसणाऱ्या मनोहर खडके या तरुणालाच राज ठाकरेंनी मंचावर बोलावले. हा तरुणच आज बेरोजगार असल्याचं त्यांनी सांगितलं. यासोबतच भाजपच्या योजना फसव्या असल्याची टीका त्यांनी केली आहे.

राज ठाकरेंनी हे आरोप केल्यानंतर पहिल्यांदाच हे आरोप खरे असल्याची अप्रत्यक्ष कबुली राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. हरिसालमध्ये लक्ष घालून तेथील तांत्रिक अडचणी सोडवण्यात येतील असं आश्वासन तावडेंनी दिलं आहे. तसंच मनोहरला नोकरी का नाही याचाही तपास केला जाईल असंही तावडेंनी सांगितलं.

राज ठाकरेंचा मनसे हा पक्ष लोकसभेची निवडणूक लढवत नसला तरी ठाकरे भाजपचे सर्वात मोठे टीकाकार ठरत आहे. यामुळेच राज ठाकरे भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहेत अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.