राज ठाकरेंच्या जलयुक्त ‘शिव्या’र; राज्य सरकारला फटकारले

0
788

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – राज्यातील ‘जलयुक्त शिवार’ योजना कुचकामी ठरली आहे. या योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले जात आहे. याचा फटका दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना बसला आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून राज्य सरकारवर फटकारे मारले आहेत. हे व्यंगचित्र आज (सोमवारी) राज ठाकरे यांनी प्रकाशित केले आहे.

या चित्रात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत १ लाख २५ हजार खोट्या विहिरी बांधल्याचे दाखवले आहे. या खोट्या गोष्टींचा फटका राज्यातील शेतकरी वर्गाला बसला आहे. राज्यावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. त्यामुळे संतापलेल्या आणि तहानलेल्या महाराष्ट्रातून सरकारला शिव्यांची लाखोली वाहिली जात आहे, असे ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रात रेखाटले आहे.

या व्यंगचित्रावर त्यांच्या चाहत्यांनी राज्यातील ही सत्य परिस्थिती असल्याचे म्हटले आहे. तसेच राज यांनी वास्तव परिस्थिती मांडल्याबद्द्ल राज यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. राज यांनी ट्विट केलेल्या या व्यंगचित्राला शेकडो लाइक्स मिळाल्या आहेत.  त्यावर अनेक कमेंटही आल्या आहेत.