राज्यात बेरोजगारी वाढण्याचं मोठं संकट, येत्या काळात तज्ज्ञ-जाणकार लोकांशी उपाययोजनांची चर्चा करा – शरद पवार

0
586

मुंबई,दि.६(पीसीबी) – राज्यात बेरोजगारी वाढण्याचं मोठं संकट येणार आहे त्यामुळे येत्या काळात तज्ज्ञ-जाणकार लोकांशी बोलून उपाययोजनांची चर्चा करा, अशी विनंती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांना केली आहे.

शरद पवार यांनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी कोरोनाचा संकट मोठं आहे पण आपण त्याला परतवून लावू असा विश्वास वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे मत आहे की पुढील काळात रोजगार कमी होऊन, बेरोजगारी वाढण्याचे संकट हे फार मोठे असणार आहे. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांना विनंती केली आहे की, पुढील काळात तज्ज्ञ, जाणकार लोकांना एकत्र आणून उपाययोजनांची चर्चा करावी, असंही पवार यांनी सांगितलं.

पुढील वर्षभरात आर्थिक परिस्थितीची काळजी घ्यायला हवी. विजय केळकरांसारख्या जबाबदार व्यक्तींना सोबत घेऊन आपण स्थितीत बदल करू शकतो. केंद्राकडूनही काही गोष्टींची राज्याला निश्चित अपेक्षा आहे. केंद्राने राज्याला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत म्हणून पॅकेज जाहीर करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलून दाखवली.