राज ठाकरेंनी आपले वक्तव्य मागे घ्यावे – रामदास आठवले

0
363

 

पुणे, दि.६ (पीसीबी) – मरकजला गेलेल्या तब्लिगींना गोळ्या घाला, असे परखड मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसापूर्वी व्यक्त केले होते. यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आक्षेप घेत राज ठाकरेंनी आपले वक्तव्य मागे घ्यावे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

रामदास आठवले म्हणाले की, राज ठाकरे यांचं वक्तव्य अगदी बेकायदेशीर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला चिर देणारे आहे. अशा पद्धतीने गोळ्या मारण्याची भाषा इंग्रजांच्या काळामध्ये होती, पण आता आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा मी विरोध करतो. यावर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे, असे रामदास आठवले म्हणाले.

राज ठाकरे यांच्या एका भावनेशी मी सहमत आहे. तब्लिगींमुळे कोरोना वाढलेला आहे. जवळजवळ तीस टक्के केसेस या मरकजला गेलेल्या तब्लिगींमुळे वाढल्या आहेत. त्यांना शिक्षा झालेली आहे. त्यांनी काही मुद्दाम हा रोग पसरवला, असे म्हणता येणार नाही. मात्र ते एकत्र जमले, ही चूक आहे, असे आठवले म्हणाले.