राज्यातील साडेचार हजार निवासी डॉक्टरांचा संप मागे

0
354

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप मागे घेण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने आणि मार्ड संघटनेचे प्रतिनिधी यांच्यात बुधवारी (७ ऑगस्ट) रात्री उशिरापर्यंत निवासी डॉक्टरांच्या मागण्यासंदर्भात बैठक पार पडली. सरकारने मागण्या मान्य करण्याचे मान्य केल्याने संप मागे घेण्यात आला. विद्यावेतन आणि इतर मागण्यांसाठी राज्यभरातील सरकारी तसेच महापालिका रुग्णालयांमधील सुमारे ४ हजार ५०० निवासी डॉक्टरांनी ७ ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारला होता.

“मागील चार महिन्यांपासून राज्यातील सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना विद्यावेतन मिळालेले नाही. तसेच मागील दीड वर्षापासून कायमच विद्यावेतनासाठी मार्डच्या डॉक्टरांना आंदोलन करावे लागत आहे. विशेष म्हणजे आंदोलन केले की एखाद्या महिन्याचे विद्यावेतन मिळते, मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे अशीच होते. त्यामुळे चारही महिन्यांचे विद्यावेतन मिळत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही”, अशी भूमिका मार्डच्या डॉक्टरांनी घेतली होती.

परंतु राज्यातील पूरस्थिती आणि आजारांचा प्रादुर्भाव पाहता हा संप मागे घेतल्याचे मार्डच्या प्रतिनिधींनी सांगितले. मात्र सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाही तर ३१ऑगस्ट रोजी पुन्हा संप पुकारण्यात येईल, असा इशाराही मार्डने दिला आहे.